आयात कर वाढविल्याने भाव वाढले

नवी मुंबई केंद्र सरकारने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील सफरचंदांवर वीस टक्के जादा आयात कर आकारल्याने देशात येणारी ही सफरचंद प्रति किलो २५ रुपयांनी महाग झाली आहेत. त्याला पर्याय म्हणून आता इटाली आणि फ्रान्सच्या सफरचंद आयात केली जाणार आहेत.

भारतातून निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंवर अमेरिकन सरकारने कर वाढविल्याने केंद्र सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या ४९ प्रकारच्या वस्तूंवर आयात कर वाढविला आहे. यात वॉशिंग्टन सफरचंदांचा समावेश आहे. यापूर्वी वॉशिंग्टनच्या सफरचंदांवर पन्नास टक्के आयात कर आकारला जात होता तो वाढवून सत्तर टक्के केला आहे.

देशात सर्वत्र काश्मीर आणि हिमाचलच्या सफरचंदांना मोठी मागणी असते. मात्र जुलै महिन्यात या दोन राज्यांतील सफरचंदांचा हंगाम संपुष्टात येत असल्याने निर्यातदार परदेशी सफरचंद मागवीत असतात. यात वॉशिग्टन सफरचंदांना मोठी मागणी असते. सर्वसाधारपणे घाऊक बाजारात १२५ रुपये किलो मिळणारी ही सफरचंद उच्चूभ्रू वसाहतीत मोठय़ा प्रमाणात विकली जातात. आयातकर वाढविल्याने यापूर्वी १२५ रुपये किलोने मिळणारी चकचकीत वॉशिंग्टन सफरचंद आता दीडशे रुपये किलो झालेली आहेत. याला पर्याय म्हणून निर्यातदार इटली, फ्रॉन्स आणि पोलंडची सफरचंद जास्त प्रमाणात मागवणार आहेत. वॉशिंग्टन सफरचंदांपेक्षा या देशातील सफरचंदांवर आयात कर कमी आहे.

भारतातील सफरचंदांचा हंगाम आता ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. ऑगस्टमध्ये हिमाचलच्या सिमला सफरचंदांना बहर येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी अर्थात ऑक्टोबरमध्ये काश्मीरची सफरचंद बाजारात दाखल होणार आहेत. देशातील सफरचंदांचा तुटवडा भासू लागल्यावरच परदेशातील सफरचंद आयात केली जातात

भारतातून अमेरिकत निर्यात होणाऱ्या काही वस्तूंवर तेथील सरकारने २५ ते ३० टक्के कर वाढविला आहे. केंद्र सरकारने गेले वर्षभर हे कर कमी करण्याची विनंती अमेरिकन सरकारला केली, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने नाइलाजास्तव अमेरिकेतून येणाऱ्या ४९ वस्तू आणि शेतमालावर आयातकर वाढविला आहे. त्यात सफरचंदाचा समावेश असून सफरचंदावर २० टक्के अतिरिक्त कर वाढला आहे.

 – सुनील सचदेव, निर्यातदार, एपीएमसी, वाशी

* वॉशिंग्टन सफरचंदावर आता ७० टक्के आयातकर

* १२५ रुपये किलोने मिळणारी सफरचंद आता दीडशे रुपयांना

* इटली, फ्रान्स आणि पोलंड येथील सफरचंदांची आयात

* देशातील सफरचंदांचा तुटवडा भासल्यासच आयात