लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : जेएनपीटीतील कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आता उघड चर्चा सुरू करण्यात आली असून कामगारांवर दबाव टाकला जात असल्याने जेएनपीटीतील कामगार आक्रमक झाले आहेत. तिनही कामगार संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. ९ डिसेंबर काळे झेंडे दाखवीत निषेध करण्यात येणार असून १६ डिसेंबर रोजी जेएनपीटी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

या दोन्ही आंदोलनात सर्व कामगार सहभागी होतील.  कामगारांच्या हक्कासाठी बलीदान द्यावे लागले तरी आमची तयारी असल्याचे यावेळी कामगार नेत्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या एकमेव असलेल्या जेएनपीटी कंटेनर हाताळणी बंदराचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव नौकानयन मंत्रालयाचा आहे. यापूर्वी जेएनपीटीच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय घेण्यात आला होता. यावेळी कामगार विश्वस्तांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करीत हा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर आता प्रशासन याबाबत कामगार व संघटनांना खासगीकरण का आवश्यक आहे हे समजावून सांगत आहेत. कामगार संघटनांच्या बैठकांसह स्थानिक राजकीय नेत्यांच्याही बैठका प्रशासनाकडून घेण्यात येत आहेत. त्यामुळे याबाबत दबाव वाढत असल्याने कामगारांत अस्वस्थता आहे.

गुरुवारी जेएनपीटी कामगार वसाहतीतील पत्रकार परिषदेते जेएनपीटीचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील व माजी विश्वस्त रवींद्र पाटील यांनी खासगीकरणाला आमचा तीव्र विरोध असल्याचे जाहीर करीत बंदराच्या अस्तित्वासाठी व कामगारांसह स्थानिकांच्या हक्कासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला. काही झाले तरी हा लढा कामगार जिंकणारच असाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.