पनवेल : विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे, भाई गिरकर, रमेश पाटील, प्रसाद लाड या सहा सदस्यांच्या कोकण दौऱ्याला बुधवारपासून पनवेल येथून सुरुवात झाली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, त्या कोकणाची जनता आज वाऱ्यावर असल्याचा आरोप करीत कोकणी माणूस शिवसेनेला याबद्दल धडा शिकवेल असा घणाघात पत्रकार परिषदेत केला.

हे सदस्य कोकणातील विविध करोना रुग्णालय, विलगीकरण कक्षाची पाहणी करून गरज भासल्यास तीन कोटी रुपयांची मदतकार्य करणार असल्याचे दरेकर यांनी या वेळी जाहीर केले. मुंबईत अडकलेल्या नागरिकांनी त्यांच्या गावी जाऊ नये असे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या याच विधानाचा दरेकर यांनी समाचार घेतला. सरकारवर टीका करताना त्यांनी कोकणातील गावांमध्ये जाणाऱ्यांसाठी विलगीकरणाची क्षमता नाही, हे सरकारचे अपयश आहे. ते लपविण्यासाठी मुंबईकरांना त्यांच्या गावी जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

टाळेबंदीतील भरगच्च पत्रकार परिषद

बुधवारी ५५ दिवसांनी टाळेबंदीतील पहिली पत्रकार परिषद झाली. या परिषदेला पनवेल, नवी मुंबई येथून सुमारे ४० पत्रकार उपस्थित होते. विधान परिषदेचे सहा सदस्य, विधान परिषदेचे दोन सदस्य, त्यांचे स्वीय साहाय्यक, चालक अशा सर्व गोतावळ्यांत अनेक महिन्यांनी सामाजिक अंतर पाळत हॉटेल दिवांश इन मधील सभागृहात पार पडली. खुद्द लोकप्रतिनिधी व पत्रकारांची परिषद पार पडल्याने अनेकांच्या खोळंबलेल्या लग्नांना मुहूर्त मिळाल्याची चर्चा पनवेल परिसरात होती. पनवेल पालिकेला या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती तसेच स्थानिक पोलिसांनीही या परिषदेला कोणतीही परवानगी दिली नव्हती.