डांबरीकरणाच्या तुलनेत सुमारे आठपट कमी खर्च; रबरमिश्रित रसायनांमुळे रस्त्यात पाणी मुरण्यास कमी वाव

नवी मुंबई शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्गाना खड्डय़ांनी ग्रासले असताना मायक्रोसरफेसिंग करण्यात आलेला पामबीच मार्ग मात्र भर पावसातही सुस्थितीत आहे. त्यामुळे हे जर्मन तंत्रज्ञान परिणामकारक ठरल्याची चर्चा आहे.

पामबीच मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरणाऐवजी नवीन मायक्रोसरफेसिंग तंत्राचा वापर करण्यात आला. त्यासाठी डांबरीकरणाच्या तुलनेत सुमारे सात ते आठ पट कमी खर्च झाला. या तंत्रामुळे पुढील ५ वर्षे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, अशी हमी ठेकेदाराने दिली आहे. गतवर्षी याच रस्त्याची दुर्दशा झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात अनेक अपघातही झाले होते. सिडकोने पालिकेला २००७ साली हा मार्ग हस्तांतरित केला होता. त्यानंतर केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग उखडला गेला होता. डांबरीकरणासाठी ५२ कोटी खर्च आला असता. या तंत्रामुळे हेच काम नऊ कोटी रुपयांत आणि कमी काळात झाले. याच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नाशिक मार्गावरही काम करण्यात आले होते. या पद्धतीत रबरमिश्रित रसायनांचा थर असल्याने रस्त्यामध्ये पाणी मुरत नाही आणि आयुर्मान वाढते. डांबरीकरणाने रस्ता बनविल्यानंतर तीन वर्षांची हमी दिली जाते.

मायक्रोसरफेसिंग केलेल्या रस्त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत नसतो. खड्डे बुजवून त्यावर सात मिमीचा थर दिला जातो. वाहतूक सुरू झाली की हा रस्ता मजबूत होत जातो. शीव-पनवेल महामार्गाची अवस्था बघता पामबीचची स्थिती उत्तम आहे.

– मोहन डगावकर, शहर अभियंता, नमुंमपा

शीव-पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालक हा रस्ता टाळून पामबीच मार्गाने प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. मोराज सर्कल येथे अतिरिक्त वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

– प्रमोद शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक, सीवूड्स