03 April 2020

News Flash

पनवेलची ‘कोंडी’ फुटणार

वर्दळीच्या महात्मा गांधी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हालचाली

(संग्रहित छायाचित्र)

पनवेल शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी (एमजी) रोडवरील आदील टॉवर ते पंचरत्न हॉटेलपर्यंतचा सर्वात गजबजलेल्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असून यासाठी नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण झाल्यास पनवेल शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

‘एमजी रोड’ हे पनवेलच्या व्यापारीवर्गाचे मुख्य बेट आहे. शहरातील मुख्य झवेरी बाजार, शनि मंदिर, टपालनाक्यावरील हॉटेल युनियन, पनवेल उपाहारगृह, ज्यू समाजाचे चर्च, याकूब बेग मशीद, बांठीया ज्वेलर्सची पेढी, पोटे मसाले अशा नावाजलेल्या व्यापारी व धार्मिकस्थळ याच रस्त्यावर आहेत. मात्र अरुंद रस्त्यामुळे सततची वाहतूक कोंडी होत असते.

पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा निर्धार घेऊन हा रस्ता रुंदीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मार्ग रुंदीकरणाच्या विकासाच्या कामात नागरिकांना सोबत घेण्याची कायदेशीर भूमिका घेत जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत.

सुमारे दीड किलोमीटर अंतराचा हा मार्ग बांधण्यासाठी पंधरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काँक्रीटचा रस्ता झाल्यास पनवेल शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ३० टक्के सुटण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीतील महात्मा गांधी मार्ग १० ते १२ मीटर अंतर रुंदीचा आहे. काँक्रीटीकरण व रुंदीकरणाचा पालिकेचा नवीन प्रस्ताव सुमारे २० मीटर म्हणजेच ५० मीटर अंतराचा बांधण्यात येणार आहे.

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मालमत्ताधारकांचे दोनही बाजूला दीड मीटर अंतराचा समान भाग या रुंदीकरणासाठी लागणार आहे. पालिकेने नियोजन करताना धार्मिकस्थळांना कमीतकमी फटका बसावा असे नियोजन केले आहे. मार्गालगत व्यापारी गाळ्यांची जागा मोठय़ा प्रमाणात जात असल्याने या विकासाचा सर्वाधिक फटका व्यापारीवर्गाला बसणार आहे. मात्र याच व्यापाऱ्यांच्या गाळ्यांसमोरील रोजच्या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे.

‘अगोदर प्रस्ताव द्या, त्यानंतर रुंदीकरणासाठी गाळ्यांचे बांधकाम तोडा’ अशी भूमिका येथील व्यापाऱ्यांची आहे. विकासाला साथ देणाऱ्या व्यापाऱ्यांना पालिकेने अद्याप सामूहिक व वैयक्तिक पद्धतीने नुकसानभरपाईचे स्वरूप कळविलेले नसल्याने व्यापारी संभ्रमात

आहेत. त्यामुळे पुढील ३२ दिवसांत नेमके कशावर हरकती घ्याव्यात याविषयी व्यापाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू आहे. पनवेल पालिकेच्या नगररचना विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणात सहकार्य करणाऱ्या मालमत्ताधारकांना नुकसानभरपाईचे दोन पर्याय सुचवू शकतात. त्यामध्ये पहिला पर्याय तीन पटीचे वाढीव चटईक्षेत्र नुकसान झालेल्या मालमत्ताधारकांना मिळू शकेल. सध्या या परिसरात दोन पटीचे वाढीव चटईक्षेत्र संबंधित जागेसाठी जाहीर करण्यात आलेले आहे. म्हणजे एखादा व्यापाऱ्याचे शंभर चौरसमीटर जागा रस्ता रुंदीकरणात गेल्यास त्याला तीनशे चौरस मीटर जागा उर्वरित जागेत बांधण्याची परवानगी पालिका देऊ शकेल. तसेच दुसरा पर्याय टीडीआरने नुकसानभरपाई मिळू शकेल. ज्यांची संपूर्ण जागा जाईल त्यांना तीन पटीचा वाढीव चटई क्षेत्राचे प्रमाणपत्र मिळू शकेल. त्याचा वापर इतर बांधकामांमध्ये करू शकेल, अशी माहिती पनवेल पालिकेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.

भाडेकरू, मालकाचा वाद

‘एमजी’ रोडवरील अनेक गाळेधारक यांच्यामध्ये मालक व भाडेकरू असा वाद सुरू आहे. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामात जाणाऱ्या भाडेकरू व मालकांची समस्या पालिकेला सोडवावी लागणार आहे. यापैकी अनेकांची वारसाची प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. जेवढे व्यापाऱ्यांच्या मालमत्ता त्यांच्याच नावावर आहेत अशी प्रकरणे निकालात काढून उर्वरित प्रकरणांसाठी न्यायायलयाचे आदेश पाळूनच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पनवेल पालिकेला करावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 12:29 am

Web Title: panvels traffic will explode abn 97
Next Stories
1 पनवेलला हक्काचे धरण?
2 नवी मुंबईत प्लास्टिकबंदीची घोषणा पोकळ!
3 सिडको घरांची पुढील महिन्यात सोडत
Just Now!
X