उरणच्या वायू विद्युत प्रकल्पातून केवळ ४५० मेगाव्ॉट वीजनिर्मिती

उरण येथील देशातील पहिल्या वायू विद्युत प्रकल्पाला चार दशके होत असून या प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला वायूचा पुरवठा नियमित तसेच पुरेसा होत नसल्याने ६७२ मेगाव्ॉट वीजनिर्मितीची क्षमता असताना केवळ ४०० ते ४५० मेगाव्ॉटच विजेची निर्मिती होत आहे. त्यामुळे क्षमता अधिक असूनही वीजनिर्मिती घटली आहे. वायूवर आधारित वीजनिर्मिती हा स्वस्त वीजनिर्मितीचा पर्याय असतानाही या पर्यायाकडे सर्व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षच केलेले आहे. याचा परिणाम वीजनिर्मितीच्या प्रमाणात घट होण्यात झाला आहे.

१९८२ च्या सुमारास उरणमध्ये ओएनजीसीच्या नैसर्गिक तेल शुद्धीकरणातून वीजनिर्मिती करण्यासाठी पहिला वायुविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. स्थापनेच्या वेळी त्याची क्षमता ९५२ मेगाव्ॉट इतकी होती. या प्रकल्पातून होणाऱ्या वीजनिर्मितीचा कोणताही परिणाम पर्यावरणावर होत नसल्याने हरित प्रकल्प म्हणून या प्रकल्पाला मान्यता मिळाली.

चार दशकांनंतर या प्रकल्पातील अनेक वीजनिर्मिती संच बंद पडले. ते दुरुस्त केले जातात. परंतु या संचांना कार्यान्वित केल्यानंतर त्यातून वीजनिर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या वायूचा पुरवठा मागणी प्रमाणात होत असल्यामुळे वीजनिर्मितीचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे.

या प्रकल्पाला लागणाऱ्या वायुपुरवठय़ात वाढ व्हावी याकरिता उरण ते गुजरातच्या हाजीरा प्रकल्पापर्यंत वायू वाहिनी टाकण्यात आली होती. याद्वारे रिलायन्सकडून खाजगीतून वायू विकत घेण्याची तयारीही प्रकल्पाकडून करण्यात आली होती. मात्र त्याचा पुरवठा न होऊ शकल्याने केवळ ओएनजीसीकडून होणाऱ्या वायुपुरवठय़ावरच भागवावे लागत आहे.

प्रकल्पाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच मांडण्यात आलेला होता. त्याचे भूमिपूजनही आघाडी सरकारच्या कालावधीत करण्यात आले होते. असे असले तरी अस्तित्वात असलेल्या प्रकल्पालाचा मागणीनुसार वायुपुरवठा होत नसल्याने प्रकल्पाचा विस्तारही रखडला आहे. त्यामुळे प्रकल्पात नव्याने निर्माण होणारा रोजगारही निर्माण होऊ शकला नाही. त्याचीही प्रतीक्षा येथील स्थानिकांना आहे.

वायू विद्युत केंद्राची वीजनिर्मिती क्षमता ही ६७२ मेगाव्ॉटची आहे. परंतु गेलमार्फत ओएनजीसीकडून ३.५ ची वायूची मागणी आहे. परंतु त्यांच्याकडून २.१ पर्यंतचाच वायुचा पुरवठा केला जात आहे. तसेच प्रकल्पातील वीजनिर्मिती संचाची संख्याही कमी झाल्याने वीजनिर्मित ४०० ते ४५० मेगाव्ॉटपर्यंत होत आहे. यात वाढ करण्यासाठी संचाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून यात वाढ होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

एस. पी. विजयकर, मुख्य कार्यकारी अभियंता, वायू विद्युत केंद्र, उरण