पक्षांतरावरून सुप्रिया सुळे यांची खंत; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी ढासळली आहे. राजकारणात काम करूनही मुलासाठी दुसऱ्याच्या दारात जाण्याची वेळ महाराष्ट्रातील युवा नेत्यांनी आणली आहे. ही फरपट पाहावत नाही. भाजपवाले काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करत होते. पण काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच पक्षात घेऊन भाजपच काँग्रेसयुक्त झाला असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी नेरुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केली. नवी मुंबईतील बदलत्या समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

राजकारणात फक्त सत्ता, पैसा, प्रतिष्ठा महत्त्वाची नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले गेले पाहिजे. मुलगा ठेकेदारीसाठी वडिलांची कारकीर्द पणाला लावत असल्याची खंत सुळे यांनी व्यक्त केली. देशभरात आर्थिक मंदी असून हजारोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सांगली कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना मदतीसाठी जाण्याचे दाखवून सेल्फी काढत राहतात ही कोणती मानसिकता आहे असा सवाल केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच जास्त विकास झाला असल्याचे सुळे यांनी सांगितले. नेते गेले म्हणून काय झाले कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा पक्ष उभारण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले.

संजीव नाईक सुप्रियांच्या स्वागताला ..

नवी मुंबईत नाईकांनी भाजपाची कास धरली असून आमदार संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला तर गणेश नाईक लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र शनिवारच्या मेळाव्यासाठी सुप्रिया सुळे यांचे स्वागत करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक सपत्नीक उपस्थित होते.