पनवेल : एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी या मार्गातील कुंडेवहाळ गावाजवळील १६९ मीटरचा बोगदा आरपार खोदण्याचे काम पूर्ण झाले. मागील सहा महिन्यांपासून हे काम सुरु होते.बुधवारी बोगदा वेळीच खणून पूर्ण केल्यामुळे बोगदा आरपार कामाची पाहणी करण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( डीएफसीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार हे कुंडेवहाळ येथील प्रकल्प ठिकाणी आले होते. यावेळी डीएफसीसी मार्गिका डिसेंबर अखेर खुली केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले. तसेच नोव्हेंबर महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर त्यावर चाचणी घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यात या मार्गिकेवर प्रत्यक्ष कंटेनरची वेगवान मालवाहू वाहतूक होऊ शकेल असा विश्वास बुधवारी प्रवीण कुमार यांनी व्यक्त केला.
या बोगद्याची उंची साडेबारा मीटर एवढी आहे. सध्या या प्रकल्पाचे १०२ किलोमीटरपैकी ९५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बुधवारी डीएफसीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी दिली. या कोरीडॉरमुळे रस्त्यावरील कंटेनर वाहतुकीचा ताण कमी होणार असून थेट रेल्वे मार्गाने लोकल आणि प्रवासी एक्सप्रेस वाहतूकीचा अडथळा न ठरता कंटेनरची वाहतूक होणार आहे. यावेळी डीएफसीसी मुख्य व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापक परमजीत सिंग, टाटा प्रोजेक्ट लिमीटेडचे उप्पलपती व्यंकट कुमार, राजकुमार शर्मा, साहिल शर्मा, टीआयपीएल कंपनी परेश ठाकूर, टीआयपीएलचे संचालक एम.पी. त्यागी, महादेव यादव, प्रकाश पाटील, यल्लालिंग दिगी, कपील कड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पॉइंटर्स
दिल्ली ते जेएनपीटी या दरम्यान वेगवान कंटेनर रेल्वे वाहतुकीसाठी एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्प
वैतरणा ते जेएनपीटी या १०२ किलोमीटरच्या पल्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला काम.
रायगड व ठाणे जिल्ह्यातील काम करण्यासाठी टाटा कंपनीमार्फत ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (टीआयपीएल) या उपकंपनीची नेमणूक.
टीआयपीएल कंपनीद्वारे मागील सहा महिन्यात कुंडेवहाळ येथील बोगदा बूमर यंत्राच्या साह्याने खोदून पूर्ण.