नवी मुंबई : स्वच्छ अभियानात कायम आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मात्र दररोज मोठया प्रमाणात कचरा निर्माण होत असतो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी या ठिकाणी खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचे पालिकेने नियोजन केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने एपीएमसीची कचरामुक्ती कागदावरच राहिली आहे.
स्वच्छ अभियानांतर्गत संपूर्ण शहर कचरामुक्त होण्यासाठी पालिकेकडून गावठाण, झोपडपट्टी भागात झीरो वेस्ट मॉडेल म्हणजेच कचरामुक्ती शहर राबविण्यात येत आहे. सोसायटय़ा तसेच घरगुती खत निर्मिती प्रक्रियावर भर देण्यात येत आहेत. मात्र एपीएमसीतील कचरा वल्हेवाटीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २०११ मध्ये अजित पवार यांच्या हस्ते खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी एपीएमसीला सिडकोकडून जागा देण्यात आली होती. त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र अद्याप त्या प्रकल्पाबाबत काहीच तोडगा निघालेला नाही. एपीएमसीच्या पाचही बाजारात दररोज दिवसाला ६० टन कचरा निर्माण होत असतो. विशेषता भाजीपाला आणि फळे बाजारात नाशवंत वस्तू जास्त असल्याने या ठिकाणी अधिक कचरा निर्माण होतो. मात्र पीएमसी बाजार समितीकडे स्वत:ची अशी
स्वतंत्र कचरा विल्हेवाट आणि खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्प नाही. येथील कचरा विल्हेवाट आणि वाहतूक करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला खर्च करावा लागत आहे. महापालिकेकडूनही याची दखल घेतली जात नाही. एपीएमसी बाजार समितीची स्वतंत्र कचरा क्षेपणभूमी असावी, असे मत बाजारातील घटकांमधून व्यक्त होत आहे.
जागेच्या शोधात
एपीएमसी बाजार समिती मोठय़ा प्रमाणात दररोज कचरा निर्माण होत असतो. मात्र एपीएमसीला या कचऱ्याची विल्हेवाट तसेच खतनिर्मिती प्रक्रियेसाठी जागा नसल्याचे कारण देण्यात येत आहे. २०११ मध्ये सिडकोकडून तीन गुंठे जागा देण्यात आलेली होती. मात्र ती जागा अपुरी पडत आहे. बाजारांत दररोज ६० टन कचरा निर्माण होता. यातील ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करायची असेल तरी २० गुंठे जागा लागणार आहे. याबाबत आम्ही नवी मुंबई महापालिकेकडे कांदा बटाटा बाजार शेजारील एचटीपी प्लांट येथील जागेची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत महापालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती एपीएमसीचे अभियंता एम.के. बेपारी यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2022 रोजी प्रकाशित
‘एपीएमसी’तील कचरामुक्तीकडे प्रशासानाचे दुर्लक्ष:खतनिर्मिती प्रकल्प रेंगाळला; जागा नसल्याचे कारण
स्वच्छ अभियानात कायम आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मात्र दररोज मोठया प्रमाणात कचरा निर्माण होत असतो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी या ठिकाणी खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचे पालिकेने नियोजन केले होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 14-04-2022 at 00:08 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration disregard waste disposal apmc composting project lingered reason lack space amy