नवी मुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरात गुटखा विक्रीचा अवैध व्यापार पुन्हा एकदा उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि एपीएमसी पोलिसांनी बुधवारी (१७ सप्टेंबर) संयुक्त छापा टाकून गुटखा जप्त केला. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाजार आवारातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा व इतर अमली पदार्थ खुलेआम विकले जात असल्याची तक्रार बाजार घटकांकडून वारंवार होत आहे. यापूर्वीही अशा छापा मोहिमा राबवण्यात आल्या; मात्र काही दिवसांतच टपऱ्या पुन्हा सुरू होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सुमारे १३० पान टपऱ्यांपैकी बहुसंख्य ठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याचे आरोप बाजार घटकांकडून केले जात आहेत. या धंद्यातून दर महिन्याला लाखोंची उलाढाल होत असून, काही स्थानिक व्यक्ती आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचेही बाजारात बोलले जाते. या कारवाईत दोन टपऱ्यांमधून किमान ५ किलो गुटखा जप्त करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

“नशामुक्त बाजार” हा उपक्रम अपयशी

बाजार आवारात वास्तव्यास असलेले काही कामगारही या विक्रीत सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून, “नशामुक्त बाजार” हा उपक्रम अपयशी ठरत असल्याची टीका बाजार घटकांकडून होत आहे. बाजार घटकांच्या म्हणण्यानुसार, अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी केवळ कारवाई न करता नियमित गस्त आणि पानटपऱ्यांच्या मूळ मालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा गुटखा माफियांचे जाळे आणखी मजबूत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एपीएमसी परिसरात गुटखा व अमली पदार्थांविरोधात नियमित कारवाई सुरू आहे. सध्या सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनासोबत मिळून विशेष मोहीम राबवली जात असून, बाजार घटकांनीही यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. – अजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी पोलीस ठाणे</strong>

बुधवारी झालेल्या कारवाईची आम्ही दखल घेतली असून, प्रशासकीय पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जातील. गुटखा बाजार आवारात शिरकाव करू नये यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिले जाईल. – विकास रसाळ, प्रशासक, मुंबई एपीएमसी