नवी मुंबई : नवी मुंबई येथील सिडकोच्या उपनिबंधक कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. या प्रकारानंतर सर्वसामान्य नागरिक देखील संतापला असून नवी मुंबईतील दोन जागरुक नागरिकांनी सिडकोच्या उपनिबंधक कार्यालयात शिरुन न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच उपनिबंधक प्रताप पाटील यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्याचे चित्रीकरण सध्या पाहायला मिळत आहे.
वाशीमधील एका इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पाच लाखाची मागणी करुन त्यापैकी साडेतीन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या सिडको उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर विभागातील लाचखोरीची प्रकरणांची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यानंतर आता या लाचखोरीच्या प्रश्नाविषयी सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबई नागरिक मंचाच्या दोन कार्यकर्त्यांनी कार्यालयात शिरुन न्याय मागण्यासाठी आलेल्या नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याचे चित्रीकरण सध्या पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले नवी मुंबई नागरिक मंचाचे कार्यकर्ते
या विभागातील शिपाई साडेतील लाख रुपयांची लाच घेऊ शकतो. तर त्याचा म्होरक्या किती शक्तीशाली असेल, पण त्यांना पकडले गेले नाही. सर्व सामान्य नागरिक येथे न्यायासाठी फेऱ्या मारतात. परंतु नंतर कळते जो भ्रष्ट आहे, त्याच्या बाजूनेच निकाल लावला जातो. येथील निकाल एकतर बिल्डर नाहीतर पैशावाल्यांच्या बाजूने दिला जातो. यांना येथे न्याय देण्यासाठी बसविले आहे. पैसे खाण्यासाठी नाही.
सर्वसामान्य माणसाकडे ताकद नसल्याने हे त्यांना दाबत आहेत. राज्यकर्त्यांवरही विश्वास टाकता येणार नाही. कारण सर्व पाकिटे येथून तिथेच पोहचतात. त्यामुळे नवी मुंबई नागरिक मंच म्हणून एक संघटना स्थापन केली आहे. या विभागाबाबतचे जे प्रश्न असतील, तुम्हाला अन्याय झाला असे वाटत असेल तर आम्हाला संपर्क करा, आमचा व्हाॅट्सॲप ग्रुप जाॅईन करा यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही असे त्यांनी सांगितले.
येथे न्याय मिळत नाही, विकत घ्यावा लागतो. येथे त्यांनाच मदत मिळते, जे एकतर शक्तीशाली आहेत, किंवा जे पैसे खर्च करु शकतात. न्याय हा सर्वांना मिळायला हवा, तो विकत घेण्याची गरज लागू नये. हे गरिबांना न्याय देण्यासाठी नाही तर श्रीमंतांना न्याय देण्यासाठी आहेत. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संंबंधित नाही असेही ते म्हणाले.