खोदकामांमुळे उद्योजक हवालदिल

नवी मुंबईतील एमआयडीसीत दिघा-रबाळे, महापे-पावणे, तुर्भे-शिरवणे या पट्टय़ात आजघडीस साडेचार हजारांच्या आसपास लहान-मोठे उद्योग आहेत.

रस्त्यांच्या दुरावस्थेसह वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने फटका

नवी मुंबई : १९६० पासून नवी मुंबईत सेवा देत असलेली आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असूनही या ठिकाणी पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने येथील प्रवास खडतर झाला आहेच शिवाय उद्योजकांमध्येही तीव्र नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांची तर पुरती दुरवस्था झाली आहेच, शिवाय खोदकामांमुळे आता वीजपुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या उद्योजकांनी महावितरणबरोबर नुकतीच बैठक घेत आपल्या समस्या मांडल्या आहेत.

नवी मुंबईतील एमआयडीसीत दिघा-रबाळे, महापे-पावणे, तुर्भे-शिरवणे या पट्टय़ात आजघडीस साडेचार हजारांच्या आसपास लहान-मोठे उद्योग आहेत. देशाला औद्योगिकीकरणाची दिशा दाखवणाऱ्या या प्रकल्पाकडे मात्र एमआयडीसी असो की महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरालगतच्या या वसाहतीत पायाभूत सुविधा नावाचा प्रकारच आहे की नाही, असा प्रश्न पडतो. एकीकडे सर्वच पातळ्यांवर नवी मुंबई शहराची देशात सुविधांच्या बाबतीत लौकिक होत असताना शेजारील एमआयडीत मात्र कोणती सुविधा चांगली आहे हे येथील घटकांना विचारले असता त्यांना एकाही सुविधेबाबत सांगता येत नाही.

रस्ते ही तर खूपच गंभीर समस्या झाली आहे. गेल्या काही दिवसांतील मोठय़ा पावसामुळे तर या ठिकाणी रस्त्यांवर फक्त दगडगोटे शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. तर याशिवाय अलीकडे वीज समस्याही गंभीर होऊ लागली आहे. एमआयडीसीत भूमिगत वाहिन्यांसाठी किंवा रस्तेदुरुस्तीसाठी खोदकाम होत असते. याचा फटका गेले काही दिवस पडत असलेल्या पावसात उद्योजकांना बसला. अनेक भूमिगत वीजवाहिन्या तुटल्याने दोन दिवस वीजपुरवठा एमआयडीसीत वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका उद्योजकांना बसल्याने त्यांच्या नाराजीत वाढ झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी ठाणे-बेलापूर लघुउद्योजक संघटना आणि महावितरण अधिकारी बैठक पार पडली. यात उद्योजकांनी या महत्त्वाच्या समस्येशिवाय इतरही अनेक समस्या मांडल्या. महावितरणकडून लवकरात लवकर सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.

रस्ते बांधकाम तसेच इतर वाहिन्यांच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी भूमिगत वाहिन्या तुटल्या होत्या. तर पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक ठिकाणी पदपथ तोडून पाण्याला वाट करून देण्यात आली होती. त्यातही वीजवाहिन्या तुटल्या होत्या. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करताना महावितरणच्या पथकाला दिवसरात्र करावा लागला होता. याशिवाय अतिरिक्त वीज देयक, वीजचोरी, बेकायदा वीज वापर अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत झालेल्या बैठकीत  शंभरहून अधिक उद्योजक उपस्थित होते.  लघु उद्योजक संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पडीयन, सचिव श्रीनिवासन आदी उपस्थित होते तर महाविरणकडून अधीक्षक अभियंता राजाराम माने व इतर अधिकारी उपस्थित होते.

आद्योगिक पट्टय़ात

१६९ ठिकाणी पाहणी केली. त्यात २९ ठिकाणी बेकायदा वीज वापर आढळून आला. त्यावर कारवाई केली असून  करोना काळात अनेकांची थकबाकी आहे. तसेच विद्युत पुरवठा खंडित होत आहे. उद्योजकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण केले जाईल.

-राजाराम माने, अधीक्षक, अभियंता, महावितरण

महावितरणने बैठक आयोजित करून उद्योजकांच्या  समस्या ऐकून घेतल्या हे स्तुत्य आहे. समन्वय आवश्यक होता. लघुउद्योग पूर्णत: वीजपुरवठय़ावर अवलंबून असून लाखो कामगारांचे जीवन चालते. मात्र गेली काही दिवसा वीज वारंवार खंडीत होत आहे.

-प्रकाश पडीयन, उपाध्यक्ष, लघु उद्योजक असोसिएशन 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Entrepreneurs are distraught due to excavations ssh