विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> :  थव्यांच्या रूपात खाडीमध्ये श्वेत-गुलाबी रंगाची चादर पसरवणाऱ्या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांच्या दर्शनासाठी नवी मुंबई हे महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. पुरेसे खाद्य आणि जैवविविधता मिळत असल्याने फ्लेमिंगोंचा यंदा मुक्कामही वाढला आहे. मात्र, हा लांबलेला अधिवास नवी मुंबईतील मच्छीमारांच्या खिशाला कात्री लावू पाहात आहे.

नवी मुंबईतील खाडीकिनारी उथळ पाण्यात सहज सापडणाऱ्या पातळी, झिंगा, तुडतुडी, कोलमी यांसारख्या मासळी आणि त्यांच्या अंडय़ांवर फ्लेमिंगो यथेच्छ ताव मारत असल्याने मच्छीमारांच्या जाळय़ात ही मासळी सापडेनाशी झाली आहे. त्यामुळे कमाईचे साधन हरवत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

मुंबई, उरण येथील खाडीकिनारी हिवाळय़ाच्या दिवसांत स्थलांतर करणारे फ्लेमिंगो पक्षी गेल्या काही वर्षांत नवी मुंबईतील नेरूळ, वाशी, बेलापूर येथील खाडीकिनाऱ्याला पसंती देत आहेत. या ठिकाणी गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने फ्लेिमगोंनी अधिवास केल्याचे आढळून येत आहे. यंदा हे प्रमाण आणखी वाढले आहे. इतकेच नव्हे तर, साधारण मार्चनंतर आपल्या मूळ अधिवासाकडे प्रयाण करणाऱ्या फ्लेमिंगोंनी मे महिना आला असतानाही मुक्काम कायम ठेवला आहे.

फ्लेिमगोंचा मुक्काम लांबल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, स्थानिक मच्छीमार मात्र हैराण झाले आहेत. पाणथळ आणि खाडीकिनारी आढळणाऱ्या छोटय़ा मासळी, त्यांची अंडी, किडे यावर ताव मारणाऱ्या फ्लेमिंगोंमुळे मच्छीमारांना ही छोटी मासळी मिळेनाशी झाली आहे.  ओहोटीच्या जागी मिळणारी पातळी, झिंगा, तुडतुडी, कोलमी यांसारखी मासळी गायब झाल्याचे कोळी समुदायातील काही नागरिकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे खाडीकिनारी फ्लेमिंगो पक्षी मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन नयनरम्य वाटते. मात्र, या पक्ष्यांमुळे अलीकडे खाडीकिनारी मिळणारी छोटी मासळी मिळेनाशी झाली आहे. याचा आम्हा मच्छीमारांना मोठा फटका बसतो.   – जयंता कोळी, दिवाळे