उरण शहरात पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसचापुरवठा करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. गेल आणि महानगर गॅसकडून गॅसपुरवठा करण्यासाठी गॅस केंद्रासाठी आवश्यक जागा मिळत नव्हती. याकरिता उरण नगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या सभेत २२५ चौरस मीटरची जागा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित पाइपद्वारे घरगुती गॅसपुरवठय़ाची योजना दृष्टिक्षेपात आली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही योजना सुरू होईल, असा विश्वास उरणच्या नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे.

देशाला घरगुती गॅससह विविध प्रकारच्या तेलाचा पुरवठा करणारा ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उरण शहराला लागूनच आहे. असे असले तरी ओएनजीसी कर्मचाऱ्यांची वसाहत वगळता या परिसरात पाइपलाइनने गॅसपुरवठा केला जात नाही. तर सध्या ओएनजीसीच्या गॅसच्या वितरणाची जबाबदारी गेल अ‍ॅथॉरिटीकडे आहे. त्यामुळे गेलकडे पालिकेने पाइपद्वारे गॅसपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियममंत्र धर्मेद्र प्रधान यांची भेट घेऊन नगराध्यक्ष महेश बालदी यांनी पाठपुरावा केला.

तीन हजार मीटर लांबीचे पाइप

योजना राबविण्याची जबाबदारी महानगर गॅस कंपनीकडे असल्याने गॅस केंद्रासाठी लागणारी जमीन देण्याची मागणी महानगर कंपनीने नगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार म्हातवली महसूल विभागातील सव्‍‌र्हे क्रमांक ७५ अमधील २२५ चौरस मीटरची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. उरण शहरातील नागरिकांनी पाइपद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्यासाठी शहरात ३,८८६ मीटर लांबीचे पाइप टाकण्यात येणार आहेत.