रुग्णसंख्या एक हजारच्या आत; अनेक केंद्रांवर नवे प्रवेश बंद

नवी मुंबई नवी मुंबई शहरात  वाशी येथे पहिला ओमयक्रॉनचा रुग्ण सापडल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत गेले आणि शहराची दैनंदिन करोना रुग्णसंख्या २५०० पार झाली. परिणामी  पालिकेनेही निर्बंध वाढवले होते.  आता आठवडय़ात ही रुग्णसंख्या १ हजाराच्या आत येऊ लागल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई शहरात जेवढय़ा वेगात दैनंदिन रुग्णसंख्यांची वाढ झाली. त्याच पद्धतीने करोनामधून मुक्त होणाऱ्यांची संख्याही दिवसाला मोठी होती. शहरातील वाशी प्रदर्शनी केंद्र येथील उपचार केंद्र वगळता इतर सर्वच केंद्रांवर नवीन रुग्ण दाखल करणेही बंद केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरात करोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात असल्याचे मत पालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे.  सध्या उपचाराधीन रुग्ण ९३८० इतके आहेत.    वाशी येथील १९ वर्षीय युवकाला नव्या उत्परिवर्तित विषाणूची लागण झाली त्यानंतर ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १० पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर समूह संपर्कामुळे दिवसाला करोना रुग्णांची संख्या २ हजारांच्यापेक्षा अधिक येत होती. एकीकडे नवे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने शहरातील सर्वच १४ केंद्रे सुरू केली होती. वाढती रुग्णसंख्या पाहता ही केंद्रेही कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु ज्या पटीत रुग्णसंख्या वाढत गेली त्याच पटीत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तिसऱ्या दिवशी करोना रुग्णाला बरे वाटू लागल्याने व उपचार कालावधी फक्त ७ दिवसांवर आल्याने वेगाने करोनामुक्त संख्याही वाढली. त्यामुळे पालिकेने वाढवलेली केंद्रे बंद करून एकाच ठिकाणी उपचार सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाशी येथील सिडको प्रदर्शनी करोना उपचार रुग्णालय वगळता इतर ठिकाणी नवीन करोना रुग्ण प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा ताण कमी झाला असला तरी सर्वानी योग्य ती खबरदारी घेण्याचे व करोना नियमावलीचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

करोना केंद्रांतील रुग्णस्थिती..

 सिडको वाशी प्रदर्शनी करोना रुग्णालय- १९१

वाशी प्रदर्शनी करोना रुग्णालय-२- ३६

सिडको प्रदर्शनी केंद्र आयसीयू- ३०

आजचे दैनंदिन करोना रुग्ण- नवे रुग्ण-६९०

एकूण करोना रुग्ण- आजचे करोनामुक्त- १६४६

एकूण करोनामुक्त- १३४२९०

एकूण करोना मृत्यू- १९९४

पनवेलमध्ये करोनाग्रस्तांची संख्या स्थिरावतेय

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात गेल्या आठवडाभरातील करोनाग्रस्तांच्या संख्येचा आढावा घेतल्यास करोना संसर्गाचा वेग स्थिरावत असल्याचे समोर येत आहे. गेल्या ३० दिवसांत २१,९७५ करोनाग्रस्त आढळले. तसेच आठवडय़ापूर्वी प्रतिदिनी दोन हजारांपार करोनाग्रस्तांची संख्या पालिका क्षेत्रात नोंदविली जात होती. मात्र सध्या हीच रुग्णसंख्या ३५० आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी लसीकरण व करोना प्रतिबंधकाची त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

नवी मुंबई शहरात करोनाची दैनंदिन  नवे रुग्ण कमी झाले असून शहरात सुरू करण्यात आलेल्या बहुतांश सर्वच करोना केंद्रांवरील नवीन रुग्ण प्रवेश बंद करण्यात आला असून वाशी प्रदर्शनी केंद्र करोना केंद्र येथेच उपचार केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील करोना स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– संजय काकडे अतिरिक्त आयुक्त