नवी मुंबई – मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी ११ जून रोजी मेगाबलॉक घेतला असून, पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
हेही वाचा – जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, भाजप महिला सेलने पोलिसांना दिले निवेदन
तसेच पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही रद्द राहणार आहे. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील आणि ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यानही लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.