उरण : येथील द्रोणागिरी ते उरण स्थानक दरम्यानच्या प्रवासात शनिवारी नेरुळ ते उरण लोकलच्या पाच मिनिटां ऐवजी तब्बल वीस मिनिटांचा उशीर लागला. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला आहे.
अवघ्या दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उरण ते नेरुळ/ बेलापूर मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र या नव्या मार्गावरील तांत्रिक बिघडाचीही संख्या वाढली आहे.वारंवार आशा घटना घडू लागल्या आहेत. शनिवारी जरी विकएंड असला तरी या मार्गावरील प्रवासी सुट्टीच्या दिवशीही प्रवास करीत आहेत. यात प्रामुख्याने खाजगी कार्यालये आणि उच्च शिक्षणासाठी नवी मुंबईत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे या विलंबाचा फटका त्यांनाही बसत आहे.
मध्यंतरी उरण नेरुळ मार्गावरील लोकल पामबीच मार्गावर तांत्रिक कारणाने काही तास बंद पडली होती. त्यानंतर शनिवारी लोकल उशिरा धावू लागली असल्याची माहिती उरण येथील प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकूर यांनी दिली आहे. या संदर्भात रेल्वे विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद नव्हता.