पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील नागरिकांना सोबत घेऊन पिण्याचे पाणी व्यवस्थित पुरवठा करा या मागणीसाठी शेकाप महाविकास आघाडीने नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयावर गुरुवारी मोर्चाचे आयोजन केले. यावेळी सिडकोने कार्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार मोर्चेकरांसाठी बंद केल्याने मातीचे हंडे घेऊन सिडकोच्या प्रवेशव्दारावर फेकून आंदोलकांनी त्यांचा रोष जाहीर केला. 

पनवेल मधील पाणी टंचाईच्या प्रश्नावर नागरिकांपेक्षा पनवेलमधील शेतकरी कामगार पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट), उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील पदाधिका-यांनी स्थानिक भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर राजकीय दृष्ट्या टिकेने लक्ष्य केले आहे. गेली १६ वर्षात पाण्याचे नियोजन करण्यास आमदार कसे असफल ठरले याविषयी पाण्याच्या मोर्चांमधून आरोप केले जात आहे. 

एकीकडे विरोधी राजकीय पक्षाकडून पाण्यासाठी मोर्चे काढले जात असताना भाजपचे पदाधिकारी खारघर, कामोठे येथून पाण्यासाठी सिडकोवर मोर्चे काढत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने वेळीच सिडकोने केलेल्या वाढीव पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास निवडणूकीत पाणी हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनण्याची शक्यता आहे.   

गुरुवारी नवीन पनवेलमध्ये काढलेल्या मोर्चातही सिडकोकडून मिळणारे पाणी आवश्यकतेनूसार पुरवठा करा, खोटी आश्वासने देऊ नका, अधिका-यांनी संवाद साधा यासोबत हॉटेल, वाहन धुण्याच्या सर्व्हीस स्टेशन आणि इमारत बांधकाम करणा-या बिल्डरांच्या पूर्वी पिण्यासाठी पुरवठा करा अशी मागणी शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शिरीष घरत, अवचित राऊत, मनसेचे योगेश चिले, शेकापचे प्रकाश म्हात्रे ही मंडळी मोर्चेकरांचे नेतृत्व करत होते. 

सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी ज्या ठिकाणची कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय त्या तक्रारीची तपासणी करण्यासाठी कर्मचारी पाठवून तक्रारींचे निराकरण केले जाईल असे सांगीतले. जिर्ण जलवाहिन्यांविषयी तक्रार असल्यास त्याची सुद्धा पडताळणी केली जाईल असे आश्वासन सिडकोच्या अधिका-यांनी मोर्चेकरांना दिले.