नवी मुंबई : तीन दिवसापासून जोरदार पावसाने शीव पनवेल महामार्गावर जागो जागी वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत होता. आज पावसाने काहीशी उसंत दिली तर शीव पनवेल मार्गावर सीबीडी येथे ऑइलचा टँकर पलटी झाल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती. पहाटे साडेचार वाजल्या पासून दुपारी १२ वाजले तरी टँकर बाजूला करण्यात यश आले नाही. मात्र सद्य स्थितीत वाहतूक सुरळीत आहे. असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.
तीन दिवसापासून खड्डे आणि मुसळधार पावसाने शीव पनवेल महामार्गावर जागो जागी वाहतूक कोंडी होत होती. मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतूक त्या मानाने सुरळीत होती. मात्र पहाटे साडेचारच्या सुमारास शीव पनवेल महामार्गावर मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावर सीबीडीला जोडणाऱ्या मार्गिकांवर ऑइल टँकरचालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले त्यामुळे टँकर पलटी झाला. सुदैवाने त्यातील ऑइल बाहेर पडले नाही. मात्र उजव्या मार्गिकेवर टँकर पलटी झाल्याने वेगात येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी अचानक ब्रेक मारून वाहन डावीकडे वळवावे लागत होते. त्यामुळे याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
टँकर पलटी झाल्याचा अपघात ज्या ठिकाणी झाला तेथून सीबीडी वाहतूक पोलीस बीट चौकी हाकेच्या अंतरावर असल्याने अपघात होताच वाहतूक पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचले. त्यांनी ट्रकच्या मागे बॅरिकेट्स लावून उजव्या मार्गिकेची वाहतूक मधल्या मार्गिकेवर वळवली. या मार्गिकेवरून उड्डाणपुलावर जाता येते. त्यामुळे सीबीडीत जाणाऱ्या गाड्यांच्या साठी सर्वात डावीकडील मार्गिकेवरून जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्या पद्धतीने बॅरिकेट्स लावल्याने वाहतूक कोंडी फार काळ राहिली नाही. मात्र वाहतूक मंदावली होती. ऑइल टँकर काढण्यासाठी हायड्रा क्रेन मागवण्यात आली होती. मात्र द्रव पदार्थ टँकर मध्येच हालत असल्याने समतोल पणा बिघत होते. त्यामुळे दुसरा रिकामा टँकर आणून त्यात ऑइल काढण्याचे सुरु करण्यात आले आहे.
सीबीडी येथे ऑइलचा टँकर पलटी झाल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झालीhttps://t.co/2jrmCKw8Ui#Oil #Tanker #traffic #CBD pic.twitter.com/bsZT095Wnf
— LoksattaLive (@LoksattaLive) August 20, 2025
हे ऑइल ज्वालाग्राही नसल्याने आग लागण्याची भीती नव्हती मात्र रस्त्यावर सांडले असते तर मोठ्या प्रमाणात गाड्या घसरून अपघात झाले असते. ऑइल एका टँकर मधून दुसऱ्या टँकर मध्ये घेताना न सांडण्याची काळजी घेतली जात होती.वाहतूक कोंडी होऊ न देण्याची काळजी वेळीच घेतल्याने सुरवातीचा काही वेळ सोडली तर वाहतूक कोंडी झाली नव्हती. दुपारी दीड दोन पर्यंत टँकर बाजूला काढून वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोसले यांनी दिली.