नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणी साठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरु आहे. मात्र या ठिकाणी केवळ पाच हजार आंदोलक आणि दीड हजार गाड्यांना परवानगी असताना त्याच्या अनेक पटिंनी आंदोलक आणि गाड्या वाढल्या आहेत. परिणामी मुंबई जॅम झाली असल्याने आज पासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या गाड्यांची तपासणी मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे. त्यामुळे वाहन्नांच्या रांगा सुमारे पाच किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत.

मराठा आरक्षण मागणी आंदोलनचा आज चौथा दिवस असून आता मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. सुमारे वीस हजार पेक्षा अधिक आंदोलक नवी मुंबईत मुक्काम करतात व दिवसा आंदोलन स्थळी अर्थात मुंबईतील आझाद मैदानात जातात. या शिवाय आंदोलकांच्या रोज कित्येक गाड्या राज्यातील विविध भागातून मुंबईत जातं आहेत. याचा ताण मुंबई वाहतुकीला बसला असून अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली होती. त्यात आठवड्याचा पाहिला कामाचा दिवस असल्याने चाकरमानी लोकही रोज कामानिमित्त मुंबईला जातात.

त्यामुळे आता मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आली आहे. शीव पनवेल मार्गांवरून मुंबईला जाताना खाडी पूल जेथे संपतो ते मानखुर्द पर्यन्त नाका बंदी लावण्यात आली आहे. यात सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी केली जातं असून त्यात जर आंदोलक असेल तर गाड्यांना मुंबईत प्रवेश न देता परत पाठवण्यात येत आहेत.

परिणामी शीव पनवेल महामार्गांवर मुंबई दिशेला प्रचंड वाहतूक कोंडी सकाळ पासून झाली आहे. खाडी पूल ते अगदी सानपाडा असे सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. दुपारी ही रांग काहीशी कमी झाली असली तरी नाकाबंदी अधिक कडक असल्याने वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना बसत आहे.

यात हलक्या वाहनातील अनेकांनी लॅपटॉप उघडून काम सुरु केले आहे. वाहतूक कोंडी असेल तरी काम चुकत नाही वर्क फ्रॉम होम ऐवजी आता वर्क फ्रॉम कार ही संकल्पना येतेय अशी मिश्किल प्रतिक्रिया अरविंद यादव या तरुणाने दिली. तर या आंदोलन बद्दल ऐकून होतो मात्र अशी परिस्थिती आहे याची जणिव नव्हती.. पथकर नाक्याच्या जवळ बस चालकाला विनंती करून खाली उतरून पाणी आणले. असेही बस मधील प्रवासी वैभव नागरगोजे यांनी सांगितले.

या बाबात वाशी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की मुंबईत नाका बंदी असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे… पुण्याच्या दिशेने पूर्ण मार्ग सुरळीत आहे. मुंबई कडे मात्र जड अवजड वाहनांना आम्ही सोडत नाहीत.