नवी मुंबई : नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले होते. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे अपेक्षित होते. मात्र दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी या निर्देशाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करत नैसर्गिक तलावांतच गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे पाहायला मिळाले. याबाबचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिल्यानंतर व सजग नागरिक मंचाकडून पालिकेला कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर पालिकेने याबाबत ठोस पावले उचलल्याचे पाच दिवासांच्या गणशमूर्ती विसर्जनावेळी दिसून आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच १४३ कृत्रिम विसर्जन स्थळे पालिकेने सज्ज ठेवली आहेत. गुरुवारी दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात होणे गरजेचे होते. मात्र गणेशभक्तांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. प्रत्येक तलावाजवळ पालिका प्रशासनाचे अधिकारी व पोलीस व्यवस्था असतानाही त्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच नागरिकांच्या विरोधामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत सजग नागरिक मंच यांनी पालिकेला नोटीस बजावली होती. त्यामुळे पालिका आयुक्त व सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी विशेष लक्ष देत सहा फुटांच्या आतील मूर्तींचे कृत्रिम तलवातच विसर्जन करून घेतले.
दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करताना न्यायालयाच्या निर्णयाचे पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उल्लंघन झाले होते. त्यामुळे सजग नागरिक मंचातर्फे पालिकेला नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे पालिकेने पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनात विशेष लक्ष देत सहा फुटांच्या आतील मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन केले. – सुधीर दाणी, सजग नागरिक मंच
पालिकेने १४३ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. दीड दिवसाच्या विसर्जनावेळी गणेशक्तांनी नियमाचा भंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी आयुक्तांच्या निर्देशानुसार सहा फुटांच्या आतील गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्यात आले. काही नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. – सोमनाथ पोटरे, उपायुक्त, परिमंडळ-१
पाच दिवसांच्या गणरायांना निरोप
नवी मुंबईत गणेशोत्सवातील पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी २२ नैसर्गिक तसेच १४३ कृत्रिम विसर्जन स्थळे सज्ज होती. या स्थळांवर ७३३४ गणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. त्यामध्ये ५०७९ श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.