नवी मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता व्यक्त होत असताना नवी मुंबई महापालिकेने (NMMC) माजी नगरसेवकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजूरी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्येक माजी नगरसेवकांसाठी दोन ते तीन कोटी रूपयांची कामे मंजूर केल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणीला सुरू झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने माजी नगरसेवकांसाठी केलेली निधी मंजूरी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असतानाच आगामी निवडणुका या दोन्ही कारणांमुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशी परिस्थिती असताना नवी मुंबई महापालिकेने मात्र माजी नगरसेवकांची विविध कामांचे निधी मंजूर केले आहेत.
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्णयामुळे माजी नगरसेवकांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. आयुक्तांनी प्रत्येक माजी नगरसेवकांची दोन ते तीन कोटींची कामे मंजूर केली आहेत. यात भाजप नगरसेवकांची १२५ ते १५० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची २५० ते ३०० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तर, दुसर्या बाजूला इतर सर्व पक्षांच्या माजी नगरसेवकांना देखील निधी देण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांच्या कामांना मंजूरी देऊन नवी मुंबई महापालिकेने राजकीय वातावरणात गोडवा आणला आहे. मात्र, या गोडव्यामागे विकासाची भावना आहे की मतांची गणिते, याबाबत आता नागरिक आणि राजकीय विश्लेषकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत.