नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी उलवे परिसरात शुक्रवारी रात्री एकाच वेळी १२ संशयित ठिकाणी छापे टाकून (कोंबिंग) कारवाई केली. या कारवाईत एका नायझेरियन नागरिकाकडे तब्बल ८४ लाख ८५ हजारांचा अंमली पदार्थ साठा मिळून आला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो मूळ नायझेरिया देशाचा नागरिक आहे.
ज्युलियस ओ अँन्थोनी (JULIUS O ANTHONY ONYEKACHUKWU) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी राबविलेल्या अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत सहपोलीस आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस आयुक्त विवेक पानसरे, गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे, विशेष शाखा उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतील उलवे नोड येथील सेक्टर क्रमांक ३, ५, १८, २४, २५ या ठिकाणी संयुक्तीकरित्या एकाचवेळी १२ ठिकाणी कारवाई करून १५ विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते. यात सात महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा : पनवेलमध्ये ३६ तास पाणी पुरवठा बंद, पिण्यासाठी की साठवणूकीसाठी पाणी भरावे सिडको वसाहतीमधील महिलांना प्रश्न
यांपैकी ज्युलियस ओ अँन्थोनी याच्याकडे ७० लाख ६० हजार रुपये किंमतीचे ७०६ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) व १४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ९५ ग्रॅम वजनाचे कोकेन असा एकूण ८४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल, डिजीटल वजन काटा ताब्यात घेण्यात आले आहेत. या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : उरण: करंजा रस्त्याची वाट बिकट; कोंडीने नागरिक त्रस्त
तसेच या कारवाईमध्ये अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या आफ्रिकन नागरीकांवर भारतीय पारपत्र कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये ७ महिला व ७ पुरूष ( नायजेरीयन – १२, युगांडा- १, कोर्ट दी आयव्हरी – १) आफ्रिकन नागरीकांना देश सोडा (लिव्ह इंडीया) अशी नोटीस बजावून त्यांना भारतातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. अंमली पदार्थ विक्रीबाबत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : उरण – खारकोपर लोकलचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते? पुन्हा चर्चा रंगली
सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त राहूल गायकवाड, डी डी टेळे, विशाल मेहूल यांचेसह परिमंडळ १ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक यांचे पोलीस निरीक्षक निरज चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय चव्हाण, एन आर आय पोलीस ठाणे परदेशी नागरीक नोंदणी विभागचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ विशाल माने यांचेसह एकूण ३५० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते.