नवी मुंबई : रक्षाबंधन अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपले असून, बाजारपेठा पारंपरिक राख्यांच्या सजावटीने रंगून गेल्या आहेत. मात्र यंदाच्या राखी खरेदीत लाबुबु राखीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ही राखी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील ग्राहक या राख्या खास आकर्षण म्हणून खरेदी करत आहेत.
लाबुबु म्हणजे काय?
लाबुबु हे ‘द मॉंस्टर्स’ या व्हिएतनामी डिज़िटल आर्ट ब्रँडमधील एक लोकप्रिय कॅरेक्टर आहे. बुटके शरीर, मोठे डोळे आणि मजेशीर चेहरा असलेले हे गोंडस पात्र इंटरनेटवर खूपच गाजले. सुरुवातीला टॉयज आणि अॅनिमेटेड व्हिडीओंमधून झळकलेले लाबुबु आता सोशल मीडियावर स्टिकर्स, रील्स आणि GIFs च्या रूपात जगभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः टीन एजर्स आणि युवा वर्गात लाबुबुची क्रेझ प्रचंड आहे.
सोशल मीडियावरून बाजारात
इंटरनेटवर आणि खासकरून इंस्टाग्राम व टिकटॉकवर लाबुबु कॅरेक्टरच्या व्हिडीओंना मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता, अनेक राखी उत्पादकांनी यावर्षी या थीमवर राख्या सादर केल्या. यामध्ये लाबुबुच्या चेहऱ्याचे छोटे प्लास्टिक किंवा सॉफ्ट टॉय आकराचे अॅक्सेसरीज वापरले जात असून, त्या आकर्षक रिबनवर बांधून तयार केलेल्या आहेत.
मुंबई, नवी मुंबईतील मार्केटमध्ये सध्या या राख्या मोठ्या संख्येने विक्रीसाठी उपलब्ध असून, लाबुबु राखीची किंमत २०० ते ३५० रुपयांदरम्यान आहे. त्याशिवाय पारंपरिक झरझरीत, कुंदन, मोरपंख, पर्ल डिझाईन राख्या, तसेच सुपरहिरो, युनिकॉर्न, मिनियन, टॉम अँड जेरी इत्यादी कार्टून थीम्स असलेल्या राख्या ५० ते ५५० रुपयांपर्यंत मिळत आहेत. ग्राहकांची पसंती लहान मुलांसाठी कार्टून राख्यांकडे तर तरुणाई लाबुबु आणि ट्रेंडी राख्यांकडे झुकताना दिसत आहे.
राखीचा सण हा बंधाची भावना व्यक्त करणारा असला तरी, आजच्या युगात ट्रेंड आणि सोशल मीडिया प्रेझेन्स हाही महत्त्वाचा भाग ठरत आहे. त्यामुळेच बहिण भावाला राखी बांधून तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना राखी किती हटके आहे, याकडेही अनेकांचा कल वाढलेला आहे.
अशा स्थितीत लाबुबु राखी ही केवळ एक डिझाइन नव्हे, तर एक ट्रेंड स्टेटमेंट बनली आहे. सणाचे पारंपरिकत्व टिकवूनही नवेपण जपण्याचा प्रयत्न यातून दिसतो आहे.
“समाज माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ट्रेंडमुळे लाबुबु राख्यांसाठी ग्राहकांकडून विचारणा होत आहे. आम्ही या राख्यांचा स्टॉक मागवल्यापासून निम्म्याहून अधिक स्टॉक विकला गेला असून, काही ग्राहकांनी यासाठी आगाऊ ऑर्डरही दिल्या आहेत. रक्षाबंधनाला अजून काही अवधी असला तरी आतापासूनच ग्राहकांचा उत्साह पाहता यंदा लाबुबु राख्या नक्कीच ट्रेंडिंगमध्ये राहणार आहेत.” – भरत राजपुरोहित, राखी विक्रेते, नवी मुंबई.