नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुर्भे विभागातील शाळा क्रमांक २५ मराठी, व शाळा क्रमांक ७१ हिंदी माध्यमाच्या इंदिरानगर येथील शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणा मुळे सातत्याने मुलांची मारामारी होऊन अनेक अपघात होत आहेत. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता देखील घसरली आहे.
शाळा क्रमांक.२५ मधील मराठी माध्यमाच्या एका कुमार व विद्यार्थ्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे. तसेच यापूर्वी देखील हिंदी माध्यम शाळा क्रमांक ७१ येथे अपघात होऊन एका विद्यार्थ्यांला दुखापत झाली होती. त्याच्याकडे शाळेतील शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याबाबत शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी यांनी शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
शाळेत १४ वर्षांपासून बदली न झालेले शिक्षक शिक्षिका आहेत. ज्या शिक्षकांच्या हलगर्जीपणा मुळे सातत्याने मुलांची मारामारी होऊन अपघात होत आहे. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख प्रविण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी विद्यार्थी व पालक यांना सोबत घेऊन शिक्षण उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे याच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. तसेच झालेल्या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी स्वरूपात उपायुक्तांनी दिल्यानंतर ती आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.