स्थानिकांना मत्स्यशेतीची संधी

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे खाडीकिनारी असलेले तलाव गाळात रुतले होते. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मत्स्यशेती करता येत नव्हती. आता तलावांतील गाळ काढण्यास काही अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबईत खाडीकिनारी असे ३०० पेक्षा जास्त तलाव आहेत. त्यात पारंपरिक पद्धतीने मत्स्यशेती केली जाते. नवी मुंबईतील वातावरण जिताडा या माशासाठी अत्यंत अनुकूल असून त्याला देश-विदेशातही मागणी आहे. या तलावांत या माशाचे उत्पादन घेतले जाते. मात्र हळूहळू या तलावांत गाळ साचला. त्यामुळे गाळ काढण्याची मागणी होत होती. मात्र कांदळवनांचे नुकसान होणार असल्याने गाळ काढण्याची परवानगी कांदळवन विभाग देत नव्हता. त्यामुळे या तलावांत मत्स्यशेती करता येत नव्हती. तलावात मासेही राहत नव्हते तसेच त्यात अमोनिया तयार होऊन मासे मृत होण्याच्या घटना घडत होत्या.

त्यामुळे तलावांतील गाळ काढणे गरजेचे होते. याबाबत रांजणदेवी मच्छीमार संघटना पाठपुरावा करत होती. खासदार राजन विचारे यांच्यासमवेत २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त एन. वासुदेवन यांच्या समवेत बैठक झाली होती. या वेळी एक समितीही नेमण्यात आली होती. मात्र प्रश्न कायम होता.

याबाबत खासदार राजन विचारे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, रांजणादेवी मत्स्यशेती प्रकल्प सेवा संघटनेचे वासुदेव वेटा तसेच महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवारी ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्रात बैठक झाली. या बैठकीत तलावांतील गाळ काढण्यास परवानगी देण्यात आली मात्र काही अटी टाकण्यात आल्या आहेत. यात गाळ काढताना कांदळवन विभागाचा कर्मचारी उपस्थित असला पाहिजे, गाळ काढत असताना कांदळवनाला काहीही नुकसान झाले नाही पाहिजे, आदी अटींचा समावेश आहे.

डिसेंबरपर्यंत  तलाव गाळमुक्त

कोपरखैरणे, घणसोली गोठीवली, तळवली, बोनकोडे आदी परिसरात हे तलाव असून डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने गाळ काढण्यात येणार आहे. कोपरखैरणे येथून या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.