कळंबोली सर्कलची कोंडी फुटणार

कळंबोली येथील वर्तुळाकार मार्गावर १३ विविध रस्ते जोडले आहेत.

सल्लागार नेमण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे बैठकीत आदेश

पनवेल : कळंबोली येथील वर्तुळाकार मार्गावर १३ विविध रस्ते जोडले आहेत. याच वर्तुळाकार मार्गिकांवरून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून नियमित वाहतूक कोंडी होत असून हा प्रेन गंभीर झाला आहे. भाजपच्या हा स्थानिक आमदारांनी हा प्रश्न थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्यासमोर बैठकीत मांडला. यानंतर गडकरी यांनी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे येथील कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंगळवारी दिल्लीत ही बैठक झाली. पनवेल, उरणला जोडणारा कळंबोली सर्कल हा महत्त्वाचे वाहतुकीचे बेट ठरत आहे. पनवेल व उरण येथे आलेले आणि भविष्यात येणारे मोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे येथील दळणवळण व्यवस्था सुरळीत असणे गरजेचे आहे. मात्र कळंबोली सर्कल येथे १३ विविध रस्ते एकाच सर्कला जोडले असल्याने येथे नेहमीच कोंडी पाहायला मिळते. मुंब्रा, भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरांत जेएनपीटीकडे जाणारे कंटेनर वाहतुकीमुळे या मार्गिकेवर ताण वाढला आहे. तसेच मुंबईहून पुणे व गोवा येथे जाणाऱ्या वाहनांमुळे वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. येथे सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतरही येथील कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जात असल्याने या बैठकीत विचारविनिमय करण्यात आले. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू असून विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील ‘एअर ट्रॅफिक’ कमी होईल, मात्र नवी मुंबईतील रस्त्यावरील कोंडी वाढू नये, या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे आवश्यक असल्याचे बैठकीत मांडण्यात आले.

जेएनपीटी, सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमा भागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या वहाळ बाजूकडील बाहेर पडण्याच्या मार्गावर चक्राकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या बैठकीला उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, सिडको, जेएनपीटी आणि एनएचएआयचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सध्या असलेल्या सल्लागारासोबत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमून पुढील २० वर्षे पुन्हा नूतनीकरणाची गरज लागणार नाही, असे नियोजन करण्याचा सल्ला गडकरी यांनी उपस्थितांना दिला. कळंबोली येथे बेट विकसित करताना सिडकोच्या जागेची गरज लागणार असल्यामुळे सिडकोने जागा इतर कारणांसाठी न देता यासाठी राखीव ठेवावी, अशा सूचनादेखील दिल्या. वाहतूक कोंडीतून मुक्तता करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी बैठकीत दिले आहे.

जेएनपीटी बंदराकडे जाणारी अवजड वाहतूक, विमानतळावरून थेट पुण्याकडे जाणारी वाहतूक एकमेकांना अडथळा न करता थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाता येईल, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘रोटरी’ प्रकारचे सर्कल विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आणखी भविष्याचे नियोजन करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागाराचा सल्ला घेऊन पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

– प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The dilemma of kalamboli circle will break ssh

ताज्या बातम्या