लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : गव्हाण ते चिरनेर या मार्गावर नुकत्याच झालेल्या दोन कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उरणच्या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची चर्चा ऐरणीवर आली आहे. या अपघातामुळे उरणच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यात खड्डे होते. त्यावेळीही अवजड कंटेनर वाहनांच्या धडकेत जीव जात होते. आता रस्ते सुसाट झाले तरीही हे संकट कायम असून यात वाढ झाली आहे. या बेदरकार व नियमबाह्य वाहनांवर वाहतूक व्यवस्थेने नियंत्रण आणावे अन्यथा उरणकरांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.

जेएनपीटी बंदरामुळे द्रोणागिरी आणि उरणमधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यांवर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या अवजड कंटेनरच्या धडकेत अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या अपघातात घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. रस्त्यावरील या यमदूतरूपी कंटेनरना आणखी किती बळी हवेत असा सवाल आता येथील वाहनचालक व जनतेकडून केला जात आहे. कारण यातील बहुतांशी अपघात हे रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या बेकायदा कंटेनर वाहनांमुळे किंवा भरधाव कंटेनर वाहनाने धडक दिल्याने झाले आहेत.

आणखी वाचा-बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पथके, हरवलेल्यांमध्ये मुलींची संख्या अधिक

जेएनपीटी बंदरातील मालाची ने-आण करणारी दहा हजारांहून अधिक कंटेनर वाहने दररोज उरणमधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करीत आहेत. या कंटेनर वाहनांच्या बेदरकारीमुळे ३४ वर्षांत शेकडो दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे तर सध्या रस्ता रुंदीकरणानंतर जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पळस्पे या दोन्ही मार्गांवर बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते किल्ला (नवी मुंबई) व जेएनपीटी ते पळस्पे या दोन्ही राष्ट्रीय मार्गांवर उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक व गावांना जोडणाऱ्या सेवा (सर्व्हिस) मार्गांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र हे सेवा मार्गच कंटेनर वाहनामुळे वाहनतळ झाले आहेत. त्यामुळे प्रवासी व दुचाकी वाहने मुख्य मार्गाचा वापर करीत आहेत. याचा फटका या वाहनांना बसून अपघातात वाढ झाली आहे.

उरणमधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील सेवा (सर्व्हिस) मार्ग सुरू करण्याची मागणी उरणमधील नागरिकांच्या वतीने वारंवार करूनही ती पूर्ण केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक विभागाकडून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे १५ टक्के अपघात कमी करण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियंत्रण करण्याकरिता मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. जंक्शन निर्मिती आदी उपायही करण्यात येत आहे. -तिरुपती काकडे, (वाहतूक) पोलीस उपायुक्त, नवी मुंबई