उरण : बहुप्रतीक्षित उरण ते नेरुळ/ बेलापूर ही लोकल सुरू होऊन २२ महिने झाले आहेत. मात्र या स्थानकांवर आणि स्थानक परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. या मार्गावरील लोकलच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या वेळी येणाऱ्या नोकरदार महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

उरण ते नेरुळ/ बेलापूर मार्गावरील पाच स्थानकांच्या परिसरात गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. या मार्गावर महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत. उरण ते खारकोपर दरम्यानच्या उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि शेमटीखार ही स्थानके आहेत. आता यात गव्हाण स्थानकाची भर पडणार आहे. या स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सिडको की रेल्वेची ही समस्या आहे. मात्र नवी मुंबईतील खारकोपरपासून पुढील स्थानकांच्या ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही हे मध्य रेल्वेकडून बसविण्यात आले आहेत. मात्र उरणच्या लोकल मार्गावरील स्थानकांना सीसीटीव्हीची प्रतीक्षा आजही कायम आहे.

उरणच्या स्थानक परिसरात अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्याचप्रमाणे अनेक दिवस उरण स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अंधार पडला होता. यातील द्रोणागिरी न्हावा शेवा तसेच शेमटीखार या स्थानक परिसरात रात्रीच्या वेळीही वर्दळ कमी असते. त्यामुळे उरण लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी उरणच्या प्रवाशांकडून केली जात आहे.

या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया दिली. मात्र त्यानंतरच्या नागरिकांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यात प्रामुख्याने दोन तासांच्या अंतराने असलेली लोकल, स्थानक परिसरातील स्वच्छता, महागडे पार्किंग, स्थानकांतील विजेचा खेळखंडोबा, उरण आणि द्रोणागिरी या दोन्ही स्थानकांच्या भुयारी मार्गात साचणारे पाणी या समस्या एकामागून एक समोर आल्या आहेत. त्यात नव्याने स्थानकांच्या दुरवस्थेची भर पडली आहे. द्रोणागिरी स्थानकांच्या भिंतीच्या मोठमोठ्या लाद्या निखळून पडत आहेत. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे.

दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?

उरण ते खारकोपर मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि शेमटीखार या स्थानकांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न कायम आहे. कारण ही स्थानके सिडकोने उभारली आहेत.