पनवेल: रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेवर स्वताचे वाहने उभे करुन झटपट लोकल पकडण्यासाठी अनेक नोकरवर्गाची धावपळ पहायला मिळते. मात्र मुंबईतून पुन्हा परतल्यावर स्वताचे वाहन उभे केलेल्या ठिकाणी नसल्याचे पाहील्यावर वाहनाची शोधाशोध सूरु होते. अखेर सर्वत्र शोधल्यानंतर वाहन मिळत नसल्याची खात्री झाल्यावर पोलीस ठाण्यात जाऊन वाहन चोरीची नोंद करण्यासाठी नवा प्रवास सूरु होतो. मात्र सध्या हार्बर व पनवेल ठाणे महामार्गावरील रेल्वेस्थानके वाहनचाेरांसाठी हक्काचे ठिकाण बनल्याचे चित्र नवी मुंबईत आहे.

बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांसमोरुन दुचाकी चोरी झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. पे अॅण्ड पार्कचे शुल्क वाचविण्यासाठी किंवा लोकल सुटू नये म्हणून मिळेल त्या जागेवर वाहने उभी करणे बुधवारी अनेक वाहनमालकांना महाग पडले आहे.एेरोली स्थानकासमोरील रस्त्यावर गेल्या आठवड्यात शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता कुलदीप कालेकर यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती. सायंकाळी पावणेसात वाजता कालेकर तेथे आल्यावर दुचाकी तेथे नव्हती. तसेच नवीन पनवेल येथे राहणारे पंकज गव्हाणे यांनी मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांची दुचाकी खांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील पदपथावर उभी केली होती. दुपारी साडेचार वाजता पंजक यांना त्यांची दुचाकी तेथून चोरट्याने चोरल्याची दिसले.

हेही वाचा: नवी मुंबई: ऑनलाईन गुंतवणूक करणे पडले महागात; तरुणीची तब्बल ११ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिस-या घटनेत मंगळवारी पनवेल रेल्वेस्थानकाच्या रिक्षा थांब्याच्या बाजूला मोकळ्या जागेत शशिकांत पाटील यांनी त्यांची दुचाकी सकाळी साडेसात वाजता उभी केली. मात्र रात्री साडेआठ वाजता ती दुचाकी तिथे नव्हती. या तीनही घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली असून नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांसमोरील मोकळ्या जागेतील उभ्या वाहनांची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. खांदेश्वर व मानसरोवर अशा रेल्वेस्थानकांसमोर वाहनतळ तात्पुरत्या स्वरुपात सिडकोने उपलब्ध करुन दिले आहे मात्र तेथे वाहनमालक दुचाकी उभ्या करत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. वारंवार वाहनचोरी होऊनही नवी मुंबई पोलीसांना गेल्या वर्षभरात दुचाकी चोरांची मोठी टोळी पकडण्यात यश आलेले नाही. वाहने स्थानकाबाहेर रामभरोसे उभी केल्याने हा प्रकार होत आहे.