05 July 2020

News Flash

मनोवेध : पुनरानुभव

रोगाचे लक्षण असलेला पुनरानुभव ‘एपिलेप्सी’ आजार असलेल्या रुग्णांना आकडी म्हणजे फिट येण्यापूर्वी येऊ शकतो.

रेने मॅग्रिटचे ‘रिप्रॉडक्शन प्रोहिबिटेड’ हे १९३७ सालचे तैलचित्र

– डॉ. यश वेलणकर

‘देजा वू’- म्हणजे पुनरानुभव तारुण्यात अधिक वेळा येतो. असा अनुभव येतो त्या वेळी, माणूस त्या ठिकाणी प्रथमच गेलेला असतो किंवा एखाद्या माणसाला प्रथमच भेटत असतो; पण तरीही त्याला आपण येथे पूर्वी कधी तरी आलो होतो किंवा त्या माणसाला पूर्वी भेटलो होतो, असे वाटत राहते. आत्ता जो अनुभव येतो आहे तो पुनरानुभव आहे असे त्याला वाटते. अशा वेळी हा पुनर्जन्माचा पुरावा आहे, असे काही जणांना वाटते. मात्र, त्याचे कारण मेंदूत आहे हे नक्की झाले आहे. हा पुनरानुभव दोन प्रकारचा आहे. निरोगी आणि रोगाचे लक्षण असलेला. रोगाचे लक्षण असलेला पुनरानुभव ‘एपिलेप्सी’ आजार असलेल्या रुग्णांना आकडी म्हणजे फिट येण्यापूर्वी येऊ शकतो. विशेषत: ‘टेम्पोरल लोब इपिलेप्सी’ असलेल्यांना अशी शक्यता अधिक असते. ‘एपिलेप्सी’ या आजारात मेंदूतील ठरावीक भागातील ‘न्युरॉन्स’ एकाच वेळी चुकीच्या पद्धतीने विद्युतधारा निर्माण करतात. असे मेंदूत ज्या ठिकाणी होते, त्याला ‘एपिलेप्टिक फोकस’ म्हणतात. मेंदूची शस्त्रक्रिया करून तो भाग दुरुस्त करता येतो. अशा शस्त्रक्रिया करणारे वाइल्डर पेनफील्ड हे सर्जन होते. त्यांनीच ‘देजा वू’ या अनुभवांचाही अभ्यास केला होता. त्यांनाच असे लक्षात आले की, ‘टेम्पोरल लोब’ला ठरावीक ठिकाणी इलेक्ट्रिक प्रोबने उत्तेजित केले तर शस्त्रक्रिया कक्षात प्रथमच आलेल्या व्यक्तीलाही असा अनुभव येतो.

त्यानंतर या अनुभवावर सतत संशोधन होत आहे. त्यानुसार १५ ते २५ वर्षांच्या दरम्यान ६० टक्के व्यक्तींना असा अनुभव कधी ना कधी आलेला असतो. जे अधिक प्रवास करतात किंवा स्क्रीनवर अधिक व्हिडीओ पाहतात, त्यांना असा अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. हा अनुभव पूर्णत: नैसर्गिक आणि निरोगी आहे. मेंदूतील स्मृतीशी निगडित भागांचा- विशेषत: ज्ञानेंद्रिये घेत असलेली माहिती आणि जुन्या स्मृती यांचा समन्वय करणाऱ्या भागात थोडासा गोंधळ झाल्याने असे होते. वय वाढते तसा हा अनुभव कमी येतो. सर्दीवर घेतल्या जाणाऱ्या काही औषधांमुळेही असा अनुभव येऊ शकतो. काही जणांना आत्ताचा अनुभव आपण पूर्वी स्वप्नात पाहिला आहे असे वाटते, तर काही जणांना हे पूर्वी ऐकले आहे असे वाटते. पण यामध्ये काहीही गूढ नसून मेंदूचाच हा एक खेळ आहे हे लक्षात घ्यायला हवे.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:08 am

Web Title: article on re experience abn 97
Next Stories
1 कुतूहल : वाटे भूतदया परी..
2 मनोवेध : पूर्वस्मृती आणि भास
3 कुतूहल : विज्ञाननिष्ठ सावित्रीच्या लेकी..
Just Now!
X