हेमंत लागवणकर

शिसं, अर्सेनिक, अँटिमनी, कॅडमिअम या जड मूलद्रव्यांना आणि त्यांच्या संयुगांना विषारी गुणधर्म आहेत. त्यामुळे अर्थातच हे धातू मानवी शरीराला; तसंच पर्यावरणाला अपायकारक आहेत. पण या मूलद्रव्यांचा शेजारी असलेला बिस्मथ धातू हा ‘जड’ मूलद्रव्यांच्या पंक्तीतला असला तरी तो तेवढा विषारी नाही. मानवी शरीराला बिस्मथ अपायकारक नसल्याने जिथे शिसं वापरणं योग्य ठरत नाही, तिथे बिस्मथचा वापर केला जातो.

बिस्मथ ऑक्सिक्लोराइड सारखी संयुगे रंगनिर्मितीच्या उद्योगात, लिपस्टिकसारख्या सौंदर्य प्रसाधनांत आणि औषधनिर्मिती उद्योगात वापरतात. उदाहरणार्थ, पोटाचे काही विकार, अपचन आणि हगवण यांवर बिस्मथ सॅलिसिलेट; म्हणजेच पेप्टो-बिस्मॉल गुणकारी आहे.

जलरंग आणि तैलरंगात पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या छटा मिळविण्यासाठी कॅडमिअम सल्फाइड वापरले जात असे. पण कॅडमिअम सल्फाइड विषारी असल्याने आता त्याची जागा बिस्मथपासून तयार केल्या जाणाऱ्या ‘बिस्मथ व्हॅनाडेट’ या पिवळ्या रंगद्रव्याने घेतली आहे. महामार्गावरील रहदारी नियंत्रित करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या खुणा केलेल्या असतात त्या रंगामध्ये बिस्मथचे क्षार मिसळतात. यामुळे तो रंग प्रकाश पडल्यावर चमकतो आणि अंधारात सहज दृष्टीस पडतो.

बिस्मथ टेल्युराइड हे रासायनिक संयुग बिस्मथ आणि टेल्युरिअम यांच्यापासून तयार केलं जातं. बिस्मथ टेल्युराइडचा अर्धवाहक म्हणून वापर केला जातो. त्याचप्रमाणे बिस्मथ, टेल्युरिअम, सेलेनिअम आणि अँटिमनी यांच्यापासून तयार केलेल्या मिश्रधातूला वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म आहेत. या मिश्रधातूमधून विद्युतप्रवाह जाऊ  दिल्यास हा मिश्रधातू एकदम थंडगार होतो. त्यामुळे याचा उपयोग शीतक म्हणून संगणकाच्या प्रक्रियकामध्ये, तसंच वातानुकूलित यंत्रणा, मिनी-फ्रिझ यांमध्ये केला जातो. या मिश्रधातूचा उपयोग काही प्रमाणात विद्युतनिर्मिती करण्यासाठीसुद्धा केला जातो.

बिस्मथसह केलेल्या मिश्रधातूंचे चुंबकीय गुणधर्म विलक्षण आहेत. बिस्मथ आणि मँगेनीजच्या मिश्रधातूपासून बिस्मानॉल हा उपयुक्त असा शक्तिशाली चुंबक तयार केला जातो.

बिस्मथचे काही मिश्रधातू कमी तापमानालादेखील सहज वितळतात. त्यामुळे त्यांचा उपयोग फायर अलार्म, तसंच विद्युत परिपथ भंजक म्हणजेच सर्किट ब्रेकरसाठी करतात.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org