News Flash

मेंदूशी मैत्री.. : ताणावर मात

स्टेजवर जाऊन बोलण्याची वेळच यायला नको, गणितातलं ते अवघड प्रकरण नको.

(संग्रहित छायाचित्र)

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

सर्व अभ्यास झालेला असतानाही काही वेळा असं घडतं की, परीक्षा सुरू झाल्यावर काहीही सुचत नाही. ‘ब्लॅन्क’ व्हायला होतं. हे लहान मुलांच्या बाबतीत घडतं असं नाही, तर महाविद्यालयीन किंवा त्यापुढच्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडू शकतं. मोठय़ा परीक्षांच्या संदर्भात असं घडण्याचं प्रमाण जास्त आहे असं दिसतं.

परीक्षेच्या शिवायही इतरही काही प्रसंग असे असतात की, ज्या वेळेला लहान असो वा मोठा माणूस असो; काही सुचत नाही. आठवत नाही. उदाहरणार्थ, इतरांशी संवाद साधण्याची भीती, स्टेजवर जाऊन बोलण्याची भीती. काही लहान मुलं चांगल्या पद्धतीने स्टेजवर बोलतात; परंतु मोठय़ा माणसांना ते जमत नाही. काय बोलायचं आहे हे माहीत असून किंवा पाठ केलेलं असूनसुद्धा त्या वेळेला बोलता येत नाही. याचं कारण काय असावं?

आपली स्मरणशक्ती म्हणजेच हिप्पोकॅम्पस हा अवयव. या अवयवामध्ये आपल्या आठवणी जतन केलेल्या असतात. त्याचं दुसरं आणि तितकंच महत्त्वाचं काम म्हणजे योग्य वेळेला त्या आठवणी क्रमवार उलगडणं. ही दोन्ही महत्त्वाची कामं हिप्पोकॅम्पस करत असतो. मात्र ज्या वेळेला ताण निर्माण होतो आणि तो प्रमाणाबाहेर वाढतो तेव्हा संपूर्ण शरीर कामाला लागतं. शरीराला वाचवण्याचे प्रयत्न चालू होतात. चालू कामापासून लांब जाणंच इष्ट आहे, असं तो सुचवतो. एवढंच नाही, तर अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून अशा परिस्थितीपासून लांबच राहावं असे संदेश देत राहतो. जेव्हा पुन्हा परीक्षा येईल तेव्हा ही परीक्षाच नको.

स्टेजवर जाऊन बोलण्याची वेळच यायला नको, गणितातलं ते अवघड प्रकरण नको. विशिष्ट ताणकारक माणसं नकोत. हे तो आधीच सांगतो. म्हणून आपण ते टाळतो. कदाचित पुढच्या वेळेला या गोष्टी चांगल्या पद्धतीने जमूही शकतात, पण पूर्वानुभव वाईट असला की पुढच्या वेळेला ‘ताकही फुंकून प्या’ असा सल्ला मेंदू देतो.

प्रचंड ताणाच्या वेळीही चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणं, दीर्घश्वसन करणं. दोन मिनिटं डोळे बंद ठेवणं, एखादं सुचेल ते गाणं मनात म्हणणं अशा काही शास्त्रीय पायावर उभ्या असलेल्या युक्त्या करता येतात. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह काही मिनिटांतच हिप्पोकॅम्पसकडे वळवता येतो आणि परिस्थितीवर मात करून सुचायला लागतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:42 am

Web Title: brain to handle the stress and anxiety
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : समस्या सोडवतो आपणच
2 कुतूहल : घडय़ाळाची टिकटिक
3 मेंदूशी मैत्री.. : चर्चा की श्रवणभक्ती?
Just Now!
X