09 July 2020

News Flash

कुतूहल : पार्श्वप्रारणांचा शोध

विश्वव्यापी प्रारणांचा शोध १९६० च्या दशकात अपघाताने लागला.

(संग्रहित छायाचित्र)

विश्वनिर्मिती ही एका ‘प्राचीन अणू’च्या महास्फोटातून झाली असल्याचे मानले गेले आहे. या सिद्धांतानुसार, विश्वजन्माच्या वेळी विश्वाची घनता आणि तापमान हे अमर्याद होते. विश्वजन्मानंतर विश्व प्रसरण पावू लागले. जन्मानंतर सुमारे ३,८०,००० वर्षांनी विश्वाचे तापमान सुमारे २,७०० अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. या तापमानाला विश्वातील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र येऊन हायड्रोजनच्या अणूंची निर्मिती होऊ  शकली. मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या घटल्याने विश्वातील प्रारणांच्या वाटेतील अडथळा कमी झाला आणि विश्व ‘प्रकाशमान’ झाले. विश्वाचे प्रसरण होत होत अखेर सुमारे १३.८ अब्ज वर्षांनंतर ते सध्याच्या स्थितीत आले. विश्वाचे आजचे तापमान सुमारे पाच केल्व्हिन (शून्याखाली २६८ अंश सेल्सियस) असल्याचे काही संशोधकांनी १९४०-५० च्या दशकांत दाखवून दिले. या प्रसरणामुळे विश्व प्रकाशमान करणाऱ्या प्रारणांची लहरलांबी काही मिलिमीटपर्यंत वाढली. अवघे विश्व हे या लघुलहरींच्या स्वरूपातील प्रारणांनी भरले असल्याचा निष्कर्ष राल्फ आल्फेर आणि रॉबर्ट हर्मन या अमेरिकी संशोधकांनी १९४८ साली काढला.

या विश्वव्यापी प्रारणांचा शोध १९६० च्या दशकात अपघाताने लागला. सन १९६४-६५ मध्ये अर्नो पेन्झिआस आणि रॉबर्ट विल्सन हे खगोलशास्त्रज्ञ अमेरिकेतील बेल प्रयोगशाळेची रेडिओ दुर्बीण वापरून दीर्घिकांच्या दरम्यान असणाऱ्या विविध रेडिओ स्रोतांची निरीक्षणे करण्यासाठी तयारी करत होते. या स्रोतांकडून येणाऱ्या रेडिओ लहरी अत्यंत क्षीण असल्यामुळे त्यांचा वेध घेण्यापूर्वी या दुर्बिणीद्वारे नोंदवली जाणारी इतर प्रकारची प्रारणे शक्य तितकी कमी करणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी रडार व तत्सम मानवनिर्मित स्रोतांची ढवळाढवळ कमी करणे, रेडिओ दुर्बिणीच्या अँटेनाचे तापमान वाढू न देणे, इत्यादी अनेक उपाय योजले. त्यानंतरही त्यांना या रेडिओ दुर्बिणीद्वारे अत्यंत क्षीण अशा प्रारणांची सतत नोंद होत असल्याचे दिसून आले. ही प्रारणे सर्व दिशांनी, तसेच दिवसा व रात्रीही सारख्याच प्रमाणात येत होती. या प्रारणांचा अधिक शोध घेतल्यानंतर ही प्रारणे म्हणजे राल्फ आल्फेर आणि इतरांना अपेक्षित असलेली विश्वव्यापी ‘वैश्विक पार्श्वप्रारणे’ असल्याचे नक्की झाले. सुमारे दोन मिलिमीटर लहरलांबीच्या या वैश्विक पार्श्वप्रारणांचा हा शोध विश्वनिर्मितीच्या महास्फोट सिद्धांताचा महत्त्वाचा पुरावा ठरला. या संशोधनासाठी पेन्झिआस आणि विल्सन यांना १९७८ साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

 डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 12:03 am

Web Title: detection of lateral radiation abn 97
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : रोजच असावा बालदिन!
2 कुतूहल : विश्वाचे प्रसरण
3 मेंदूशी मैत्री : मेंदूपूरक हक्क
Just Now!
X