‘‘गणित हा रुक्ष विषय आहे, त्यात मानवी भावनांना काही स्थान नाही,’’ असा आक्षेप अनेक जण घेतात. गणित अमूर्त असल्यामुळे व्यक्तिनिरपेक्ष आहे, साहजिकच ते भावनाहीन आहे. परंतु गणित निर्माण करणाऱ्या गणितज्ञांच्या गोष्टी आणि गणिताचा इतिहास हे सारे रोमहर्षक व भावपूर्ण आहे. या इतिहासाची अध्यापनाशी सांगड घातल्यास गणित शिक्षण अधिक रंजक होते. याची साक्ष गणिताचा इतिहासच आपल्याला देतो. शत्रुसैन्य शहरात घुसले तरी भूमितीच्या आकृत्यांमध्ये दंग राहिलेल्या आणि त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या आर्किमिडीज्ची गोष्ट किशोरवयीन फ्रेंच युवती सोफी जर्मेनने (इ.स. १७७६-१८३१) वाचली व गणित शिकण्याचा निश्चय केला. त्या काळात स्त्रियांनी गणिताचे शिक्षण घेणे समाजमान्य नव्हते, तरीही विरोधाचा सामना करून ती प्रथितयश गणितज्ञ बनली.

सुमारे ३०० वर्षे अनुत्तरित फर्माच्या शेवटच्या प्रमेयाची गोष्ट ब्रिटिश विद्यार्थी अ‍ॅण्ड्रय़ू वायल्सने शाळकरी वयात ऐकली आणि त्या प्रमेयाची सिद्धता शोधण्याचे ध्येय ठरवले. मोठेपणी अथक प्रयत्न करून त्याने या प्रमेयाची सिद्धता शोधली (१९९५). ऐतिहासिक गोष्टींमध्ये अशी अमर्याद प्रेरकशक्ती असते. गणिती संकल्पना कुणी, कधी आणि कशा शोधल्या, त्यासाठी किती कष्ट घेतले हे विद्यार्थ्यांना सांगितले तर त्या त्या गणितज्ञाबद्दल आणि संकल्पनांबद्दलही आत्मीयता जागृत होऊन शिकण्याच्या प्रक्रियेत सकारात्मकता येते.

गणिताच्या इतिहासातून संकल्पनांच्या विकासाचे टप्पेही समजतात. हे टप्पे अध्यापनात अनेकदा उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, शालेय अभ्यासक्रमात वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सामील आहे. त्याची सिद्धता कलनशास्त्रावर (कॅल्क्युलस) आधारित आहे. परंतु कलनशास्त्र शालेय अभ्यासक्रमात नाही. अशा वेळी गणेश दैवज्ञ यांनी दिलेली वर्तुळपाकळ्या एकमेकींना उलटय़ासुलटय़ा जोडून वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याची पद्धत उपयोगी ठरते. संकल्पना शिकताना विद्यार्थ्यांना त्यांचा शोध नव्यानेच लागत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची त्या वेळची मानसिकता, प्रतिक्रिया आणि अडचणी इतिहासात ती संकल्पना प्रथम शोधली गेली त्या वेळच्या प्रक्रियेशी साधम्र्य सांगतात. त्यामुळे गणिताच्या इतिहासाचा अभ्यास शिक्षकालाही मार्गदर्शक ठरू शकतो. गणिताचे अध्ययन आणि अध्यापन आनंददायी करण्यात गणिताचा इतिहास महत्त्वपूर्ण ठरतो, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. गणिताच्या प्राचीन इतिहासातली काही सोनेरी पाने पुढील काही लेखांमधून उलगडून पाहू..

– प्रा. माणिक टेंबे
मराठी विज्ञान परिषद,
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
ईमेल : office@mavipamumbai.org