डॉ. यश वेलणकर  – yashwel@gmail.com

एका छोटय़ा गोष्टीवर लक्ष ठेवून ते विचलित झाले आहे याचे भान आले की पुन:पुन्हा तेथेच लक्ष नेणे, हे  एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त असते. मात्र याचाच सराव सतत करत राहिल्याने कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता कमी होते असे आधुनिक संशोधनात दिसत आहे. असे होणे स्वाभाविक आहे कारण मेंदूतील अन्य फाइल्स बंद करण्याचाच हा सराव असतो. एकाग्रतेचा सराव सुरुवातीला आवश्यक असला तरी मानसोपचार म्हणून यापेक्षा ‘समग्रता ध्याना’चा, ‘साक्षी ध्याना’चा सराव अधिक आवश्यक असतो. त्यामध्ये लक्ष एका ठिकाणी केंद्रित न करता संपूर्ण शरीरावर, मनावर आणि भोवतालावर लक्ष नेणे आणि जे काही जाणवते त्याचा स्वीकार करणे असा सराव करायचा असतो. याला ‘पूर्णभान’ म्हणू शकतो. ते विकसित करण्यासाठी शरीर स्थिर ठेवायचे आणि पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरात कुठे दुखते आहे, खाज उठते आहे, धडधड, जळजळ होते आहे का हे कुतुहलाने पाहायचे. डॉक्टर रुग्णाला तपासत असताना कुठे दुखते असे विचारतात तसे स्वत:ला विचारायचे आणि कुठेही दुखत असेल तर त्याच्या सीमा जाणवतात का हे पाहायचे. कुठपर्यंत दुखते आहे आणि कुठे दुखत नाही हे न्याहाळायचे. असे ध्यान जुनाट शारीरिक वेदनांचा त्रास कमी करण्यासाठी उपचार म्हणून उपयुक्त आहे असे  सिद्ध झाले आहे. वेदना असेल त्यावेळी निसर्गत: आपले लक्ष जेथे दुखते आहे तेथे जात असते. सराव करताना आपले ध्यान प्रयत्नपूर्वक विस्तारित करायचे. म्हणजे गुडघा दुखत असेल तर मांडीपासून तळपायापर्यंत पूर्ण पायावर लक्ष विस्तारित करायचे. कंबर दुखत असेल तर पूर्ण पाठीवर लक्ष ठेवायचे. सरावाने पूर्ण शरीरावर लक्ष विस्तारित करणेही शक्य होते. असे करतो त्यावेळी वेदनांची तीव्रता कमी होते. शरीरात कोणत्याही वेदना होत असतील त्यावेळी तपासण्या करून त्यांचे कारण शोधायला हवे, ते दूर करण्यासाठी शक्य असतील ते औषधोपचार करायला हवेच; मात्र काहीवेळा असे उपचार करूनही वेदना कमी होत नाहीत. अशावेळी या ध्यानाचा सराव उपयोगी ठरतो. वेदनांचे कारण जसे त्या अवयवात असते तसेच मेंदूतही असते. म्हणूनच अ‍ॅम्प्युट केलेला प्रत्यक्षात नसलेला पाय दुखतो आहे असे वाटू शकते (याला फँटम िलब म्हणजे पायाचे भूत म्हणतात). स्वत:च्या शरीराकडे साक्षीभावाने पाहिल्याने मेंदूतील कारण दूर होऊन त्रास कमी होतो.