03 March 2021

News Flash

मेंदूशी मैत्री : न्युरॉन्सचा वेग

खेळ शिकताना कॉर्पस कलोझम आणि शरीराचं संतुलन घडवणाऱ्या केंद्रांमध्ये घडामोडी होतात.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मेंदूतल्या प्रत्येक क्षेत्रात न्युरॉन्स असतात. माणूस जसजसे नवे अनुभव घेतो, तसतसे दोन न्युरॉन्स एकमेकांना जुळतात. अशा प्रकारे एखाद्या वृक्षासारखी त्यांची रचना होत जाते. असे अब्जावधी न्युरॉन्स प्रत्येक क्षेत्रात असतात. उदा. भाषेचं क्षेत्र, संगीताचं क्षेत्र. इ. मुलं भाषा ऐकतात, तेव्हा भाषेतल्या ब्रोका आणि वर्निक या क्षेत्रात न्युरॉन्स जुळतात. ते जुळले की त्यांना भाषा समजायला लागते. सांगितलेल्या सूचना त्यांना समजतात. यापुढचा टप्पा असतो वाचन-लेखनाचा. जेव्हा मुलं वाचायला, लिहायला शिकतात तेव्हा या भाषा ऐकल्यामुळे जुळलेल्या न्युरॉन्समध्ये नवे न्युरॉन्स येऊन मिळतात.  अशाच प्रकारे आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा पहिल्या भाषेची मदत होते. खेळ शिकताना कॉर्पस कलोझम आणि शरीराचं संतुलन घडवणाऱ्या केंद्रांमध्ये घडामोडी होतात.  अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मेंदूत डोकावल्यास असं दिसतं की, प्रत्येक क्षेत्रात न्युरॉन्स विद्युत-रासायनिक संदेशांची देवाणघेवाण करत असतात. काही क्षेत्रांत यांच्या जुळणीचा वेग कमी असतो, तर काही क्षेत्रांत जास्त! जेव्हा आपण एकच काम वारंवार करतो, तेव्हा ती गोष्ट सरावाची होते. त्या वेळेस जुळलेल्या न्युरॉन्सवर मायलिन शीथ हे आवरण तयार होतं. हे मायलिन शीथ विशिष्ट प्रथिनांपासून बनलेलं असतं. या प्रक्रिया मेंदूत सतत होत असतात. त्यातून शिकणं आणि सराव या दोन गोष्टी कायमस्वरूपी चालू असतात.  या मूलभूत संशोधनांवर आधारित अभ्यास डॉ. गार्डनर यांनी केला आहे.

या संशोधनातील आठ बहुआयामी बुद्धिमत्ता याप्रमाणे – १. गणिती – तार्किक  २. व्यक्तीअंतर्गत  ३. निसर्गविषयक ४. भाषिक – वाचिक   ५. शरीर – स्नायूविषयक बुद्धिमत्ता ६. आंतरव्यक्ती  ७. दृश्य – अवकाशीय ८. संगीतविषयक. याशिवाय अस्तित्ववादी आणि नैतिक या दोन बुद्धिमत्तांचाही उल्लेख केला जातो.

या संदर्भात त्यांचं मत-(१) बुद्धिमत्ता ही एक प्रकारची नसते. तर प्रत्येक व्यक्तीत अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. (२) प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असते. विविध कामं करण्याचं काम विशिष्ट क्षेत्रांकडे सोपवलेलं असतं. (३) या विविध क्षेत्रांमधल्या न्युरॉन्सच्या जुळणीच्या वेगावर आपल्या बुद्धिमत्ता ठरत असतात.

यापुढील काही भागांमध्ये सर्व बुद्धिमत्तांविषयी जाणून घेणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:18 am

Web Title: neuron structure neurons in the human brain
Next Stories
1 कुतूहल : सात पुलांचे कोडे
2 मेंदूशी मैत्री : बुद्धिमत्तांच्या छटा
3 मेंदूशी मैत्री : हुशार कोण?
Just Now!
X