अनेकदा सजीवांतील एखादी प्रजाती तिचा मूळ प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात येते किंवा आणली जाते. मग ती तिथे रुजते, वाढते, पसरते आणि इतर स्थानिक प्रजातींना वाढू देत नाही. अशा प्रजातींना आक्रमक प्रजाती (इन्व्हेजिव्ह स्पेशीज्) असे संबोधण्यात येते.

एखाद्या तळ्याकाठी सहज चक्कर मारली, तर तिथे काही ठिकाणी संपूर्ण तळे व्यापलेली जलकुंभी (वॉटर हायसिंथ) ही एक विशिष्ट प्रकारची वनस्पती आढळून येते. आपल्या आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारला असता रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली घाणेरी नजरेस पडते. जलकुंभी असो किंवा घाणेरी, या प्रजाती भरपूर प्रमाणात पसरलेल्या दिसून येतात. यांना आक्रमक प्रजाती असे म्हणतात.

‘झूलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ या संस्थेच्या २०१७ च्या अहवालानुसार, भारतात आक्रमक प्राण्यांच्या १५७ प्रजाती आढळून येतात. त्यांपैकी ५८ प्रजाती जमिनीवर आणि गोडय़ा पाण्यात, तर ९९ प्रजाती खाऱ्या पाण्यात आढळतात. याबाबत झाडांच्या संख्येचा तर विचारच करायला नको!

आक्रमक प्रजातींचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची विलक्षण प्रजनन क्षमता. त्या अतिशय वेगाने आपली संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात असतात, जेणेकरून त्यांचा अधिवास अधिक सुखकर व्हावा. कोणत्याही प्रकारच्या खाद्यावर जगण्याची त्यांची क्षमता असते. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे खाद्य लागणाऱ्या आणि विशिष्ट प्रकारच्या अधिवासात जगणाऱ्या प्रजाती कधीच आक्रमक प्रजाती बनू शकत नाहीत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रजाती कुठल्याही प्रकारच्या बदलाला सहजरीत्या अनुकूल बदल स्वत:मध्ये घडवू शकतात. बऱ्याचदा हे बदल जनुकीयसुद्धा असू शकतात.

वर उल्लेख केल्याप्रमाणे, या आक्रमक प्रजातींचा स्थानिक प्रजातींवर वाईट परिणाम होतो. कित्येकदा यांच्यामुळे अनेक स्थानिक प्रजाती नामशेष होतात. त्या भागातील जैवविविधता आक्रमक प्रजातींमुळे धोक्यात येते. परिसंस्थेचा समतोल बिघडतो.

हे सर्व थांबविण्यासाठी आपण सर्वानी स्थानिक, विदेशी आणि आक्रमक प्रजाती माहीत करून घ्यायला हव्यात. याबद्दल जनजागृती घडवून आणायला हवी आणि जेथे शक्य असेल तेथे आक्रमक प्रजातींचा प्रसार थांबविण्यासाठी योग्य ते प्रयत्न करायला हवेत.

सुरभि वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

office@mavipamumbai.org