जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी म्हटले होते की, ‘विश्व गणितीय भाषेतच लिहिलेले आहे.’ त्यानुसार गणिताचे उपयोजन नागरी जीवनातही अतिशय उपयुक्त आहे. कोणत्याही नगराच्या मूलभूत गरजा जाणून त्यांचे व्यवस्थापन करताना उद्भवलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गणिती प्रारूपांनी दिलेल्या उपाययोजना बहुधा यशस्वी ठरतात, असा अनुभव आहे. मर्यादित भूखंड आणि लोकसंख्यावाढ यांमुळे नगरांचा उभ्या दिशेने विस्तार होतो; म्हणजे टोलेजंग इमारती बांधण्याची व्यवस्था लोकप्रिय होत जाते. त्यावर नियंत्रण म्हणून बांधकामाची मर्यादा ठरविण्यासाठी ‘चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय)’ वापरतात. हा निर्देशांक एकूण बांधकामाची मर्यादा भूखंडाच्या क्षेत्रफळाशी जोडतो. त्यामुळेच बांधकामाला व आधुनिक नगराला सुयोग्य दिशा मिळते. यातील गणित प्राथमिक असले, तरी प्रभावी ठरते.

नागरी प्रवासी परिवहन तसेच मालवाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी गणिती प्रारूपे (मॉडेल्स) आणि गतिमान प्रायोजन (डायनॅमिक प्रोग्रामिंग) यांचा उपयोग होतो. वाहतूक व्यवस्थेतील बस, रेल्वे, मेट्रो, विमानतळ यांची पायाभूत रचना करण्यात, म्हणजे रस्ते, रूळ, सेतू, बोगदे आदींसाठी गणिताधारित अभियांत्रिकीचा आणि प्रारूपांचा वापर होतो. सार्वजनिक परिवहन सेवा नागरिकांसाठी इष्टतम, आकर्षक आणि कार्यक्षम करण्यासाठीही विविध गणिती पद्धतींचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे वापर केला जातो. सतत वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहन क्रमांक देण्यासाठी गणितातील कप्प्यांचा सिद्धान्त आणि प्रगणन नियम वापरतात. संगणकाच्या उपयोगाने क्षेत्रीय वाहतूक नियंत्रणाची गणिती प्रारूपे अधिक विस्तृत स्वरूपात वापरणे शक्य झाले आहे. प्रवाशांच्या दृष्टिक्षेपात जास्तीत जास्त सुविधा व सेवाकेंद्रे यावीत, परंतु गर्दीची समस्या उद्भवू नये या बाबींचे संतुलन साधून सार्वजनिक वाहनतळाची इष्टतम रचना करण्यासाठी सारणी (मॅट्रिक्स) बीजगणितावर आधारित काही निर्देशांक मार्गदर्शक ठरतात. शहरांतील पेयजलवाहिन्या, विद्युतवाहिन्या, पर्जन्यवाहिन्या, रस्ते-रेल्वे-बस वाहतुकीचे जाळे अशा विविध जाळ्यांतून कमीतकमी वेळात आणि कमीतकमी खर्चात सेवा पुरवण्याच्या कार्यक्षम पद्धती आलेख सिद्धान्त, जाळ्यांचे विश्लेषण या गणिती शाखांच्या साहाय्याने योजल्या जातात.

संगणक संचालित भौगोलिक माहिती संयंत्रणा (जिऑग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम) चित्रे, नकाशे आणि तद्संबंधित आकडेवारी अंकीय स्वरूपात साठवून एकत्र गुंफते. बिंदू, रेषा आणि परिबद्ध बहुभुज- विशेष विश्लेषण तसेच त्रिमितीय भूमितीमधील कित्येक गणिती संकल्पना या संयंत्रणेचा पाया आहेत. ही संयंत्रणा भूवापर नियोजन, नगर व्यवस्थापन, परिवहन व्यवस्था रचना व संचालन, पाणी, वीज आणि घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आदी क्षेत्रांत उपयुक्त असते. अशा प्रकारे नागरी जीवनातील जटिल समस्या सोडविण्यासाठी गणिताचा वेगवेगळ्या रूपांत आणि स्तरांवर भरीव प्रमाणात वापर होतो.

– प्रा. श्यामला जोशी

 मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org