नवदेशांचा उदयास्त :  सध्याचे बल्गेरिया

बल्गेरिया सध्या युनो, नाटो, युरोपियन युनियन वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे.

बल्गेरियाचे विद्यमान अध्यक्ष रूमेन रादेव्ह  आणि त्यांचे समर्थक

बल्गेरियात १९४६ साली रशियन प्रभावाखालचे जॉर्जी डिम्रिटीव्ह यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाचे एकपक्षीय प्रजासत्ताक सरकार सत्तेवर आले. या सरकारने नियोजनबद्ध विकास करून बल्गेरियाच्या अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा घडवून आणली. त्यासाठी औद्योगिक उत्पादनावर भर दिला. पुढे १९८८ मध्ये पोलंडमध्ये सुरू झालेल्या कम्युनिस्ट सरकारविरोधी बंडाने क्रांतीचे स्वरूप धारण करून हे क्रांतीचे लोण बल्गेरिया आणि इतर पूर्व युरोपियन देशात पसरले. पाच सहा वर्षे पूर्व युरोपियन देशात चाललेल्या या क्रांतिकारी कारवायांमुळे बल्गेरियातल्या तोदोर झिव्हकॉव्ह यांच्या सरकारने १९८९ मध्ये राजीनामा दिला आणि तिथे बहुपक्षीय संसदीय लोकशाही राजकीय व्यवस्था आणली गेली. यानंतरच्या पहिल्या खुल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बल्गेरियन सोशालिस्ट पक्ष विजयी होऊन सत्तेवर आला. दोन वर्षांनी, १९९१ मध्ये राजकीय व्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले गेले. यामध्ये नवीन राज्यघटना अमलात आणून अध्यक्ष आणि पंतप्रधानांकडे पूर्वी असलेले अनेक अधिकार कमी करण्यात आले. या सर्व राजकीय बदलांमध्ये पुढची सात आठ वर्षे बल्गेरियाची अर्थव्यवस्था घसरणीला लागली. परंतु २००१ नंतर मात्र उत्तरोत्तर या देशात नवनवीन योजना अमलात आणून आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे. बल्गेरिया सध्या युनो, नाटो, युरोपियन युनियन वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे. रूमेन रादेव्ह हे या देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. सोफिया हे बल्गेरियाचे राजधानीचे शहर. संसदीय लोकशाही राज्यव्यवस्था असलेल्या बल्गेरियात पंतप्रधान हा सरकारचा कार्यकारी प्रमुख असतो. राष्ट्राध्यक्षाला त्यामानाने नियंत्रित अधिकार असतात, राष्ट्राध्यक्ष हाच लष्कर प्रमुखपदी असतो.

सध्याचा बल्गेरिया हा एक विकसनशील देश आहे. एकेकाळी, १९४८ मध्ये या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषिक्षेत्रावर अवलंबून होती ती १९८० साली बदलून मुख्यत: औद्योगिक उत्पादनांवर निर्भर बनली आहे. येथील औद्योगिक उत्पादनांमध्ये रसायन उद्योग, यंत्रसामग्री उत्पादन, तंबाखू आणि अन्नपदार्थावरील प्रक्रिया उद्योग यांचा मोठा वाटा आहे. असे असले तरी राजकीय नेत्यांच्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे येथील अर्थव्यवस्था पोखरली गेली आहे. सत्तर लाख लोकवस्तीच्या बल्गेरियात सध्या ६२ टक्के ख्रिश्चन धर्मीय, ८ टक्के मुस्लीम आहेत.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Current bulgaria all about bulgaria zws

ताज्या बातम्या