आधुनिक वैद्यकशास्त्रातला हृदयक्रियेचा अभ्यास हा गेल्या अडीचशे वर्षांत झाला आहे. या अभ्यासाच्या सुरुवातीलाच एक वाद निर्माण झाला. अठराव्या शतकात आलब्रेश्ट फॉन हालर या स्वीस वैद्यकतज्ज्ञाने एका सस्तन प्राण्याचे हृदय त्याच्या शरीराबाहेर काढल्यावरही, काही काळासाठी या हृदयाची स्पंदने चालूच राहिली. आलब्रेश्टच्या मते, मज्जासंस्थेशी संबंध तोडला गेलेला असतानाही ही स्पंदने चालू राहिली, याचा अर्थ हृदयाच्या स्पंदनांचा संबध मज्जासंस्थेशी नसून तो हृदयाच्या स्नायूंशीच असावा. यानंतर फ्रान्सच्या सेझार लेगोलॉयने इ.स. १८१२ साली एक प्रयोग केला. या प्रयोगांत त्याने सस्तन प्राण्याच्या पाठीचे कणे चिरडून टाकले. या प्राण्यांच्या हृदयांची स्पंदने मात्र मज्जारज्जू नष्ट झाल्याबरोबर थांबली. यावरून लेगोलॉयने हृदयाच्या स्पंदनांचा मज्जासंस्थेशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढला. याच सुमारास बेंजामिन ब्रॉडी या ब्रिटिश वैद्यकतज्ज्ञाने कुत्र्यांचा आणि सशांचा शिरच्छेद करून पाहिला. शिरच्छेदानंतरही या प्राण्यांच्या हृदयाचे स्पंदन चालूच होते. मतांतरामुळे हा वाद असाच पुढे चालू राहिला.
इ.स. १८८०च्या सुमारास इंग्लंडच्या वॉल्टर गॅस्केल याने कासवावरील प्रयोगांत, कासवाच्या हृदयाच्या स्पंदनांचा उगम हृदयाच्या वरच्या कप्प्यात होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यानंतर त्याने कासवाच्या हृदयातील मार्ग क्रमाक्रमाने बंद करून पाहिले. या प्रयोगाद्वारे कासवाच्या हृदयाचे स्नायू स्वतहून आकुंचन पावत, हृदयाची स्पंदने पुढे नेऊ शकतात हे त्याने दाखवून दिले. यावरून हृदयाचे कार्य मज्जासंस्थेच्या मदतीने नव्हे तर स्वतंत्रपणे चालत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यानच्या काळात हृदयातील विविध भाग शोधले जात होते. यातला एक महत्त्वाचा भाग होता तो, स्कॉटलंडच्या आर्थर कीथ आणि इंग्लंडच्या मार्टनि फ्लॅक यांनी १९०७ साली शोधलेला ‘सायनोआर्टरियल नोड’. हृदयाच्या वरच्या कप्प्यात वसलेल्या या भागापासूनच हृदयाच्या स्पंदनांची लहर सुरू होत असण्याची शक्यता दिसून येत होती. अल्पावधीतच, डच वैद्यकतज्ज्ञ विल्हेम आइनथोव्हेन याने विकसित केलेल्या इलेक्ट्रोकार्डिओग्राफी या तंत्राद्वारे, सायनोआर्टरिअल नोड या भागावर ऋण विद्युतभार निर्माण होत असून, तिथूनच हृदयाच्या स्पंदन लहरींना सुरुवात होत असल्याचे नक्की झाले. यामुळे हृदयाचे स्पंदन हृदयातच निर्माण होणाऱ्या विद्युतलहरींशी निगडित असल्याचे स्वीकारले गेले. आर्थर किथ आणि मार्टनि फ्लॅक यांनी शोधलेला सायनोआर्टरियल नोड हा हृदयातला नैसर्गिक पेसमेकर ठरला!
– डॉ. अंजली कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org