सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

रशिया लिथुआनियन राजकीय व्यवस्थेचे आणि समाजाचे पद्धतशीर सोव्हिएतीकरण करीत असतानाच २२ जून १९४४ रोजी नाझी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर आक्रमण केले. लिथुआनिया पुन्हा जर्मनीच्या ताब्यात गेला परंतु महायुद्धात आता दोस्तराष्ट्रांची सरशी होत होती, केवळ तीनच महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये रशियाने जर्मनीवर प्रतिहल्ला करून लिथुआनियाचा कब्जा घेतला. १९४४ ते १९५३ या काळात स्टालीनने पुन्हा कठोरपणे लिथुआनियाचे सोव्हिएतीकरण सुरू केले. हजारो विरोधकांना सैबेरियात हद्दपार केले, लिथुआनियाच्या राष्ट्रीय बोधचिन्हांवर बंदी घातली. लिथुआनियन नेत्यांनी सोव्हिएत युनियनमध्ये सामील होण्यास नकार देत रशियन फौजांशी गनिमी काव्याने लढण्यास सुरुवात केली. या चळवळीतून देशाच्या स्वातंत्र्याची मागणी करीत ५० हजार बंदूकधारी लिथुआनियन तरुण भूमिगत झाले. जंगलात राहून रशियन सैनिकांवर त्यांनी हल्ले सुरू केले.

स्टालीनने आणि नंतर आलेल्या सोव्हिएत प्रमुखांनी लिथुआनियात तेथील मूळच्या वांशिक लिथुआनियन लोकांना हटवून तेथे रशियन आणि इतर युरोपियन लोकांचे प्रमाण वाढविण्याची मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांनी रशियन कारागीर, कामगार, बुद्धिजीवी लोकांना प्रोत्साहन देऊन हजारो रशियन कुटुंबांना सवलती देऊन लिथुआनियन प्रदेशात स्थलांतरित केले, लिथुआनिया आणि इतर बाल्टिक देश सक्तीने का होईना, सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाले असले तरी सोव्हिएत नेत्यांनी त्यांचे रूसीकरण, कॅथलिक धर्माचरणावर अंकुश ठेवून त्यांचे कम्युनिस्ट प्रणालीने निधर्मीकरण करणे सुरू केल्यामुळे जनतेत सोव्हिएत सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या अनेक भूमिगत संघटना तयार झाल्या. असा संघटनांपैकी लिथुआनियन हेलसिंकी ग्रुप यांनी लिथुआनिया स्वातंत्र्याची मागणी आणि धार्मिक स्वातंत्र्याची मागणी करीत प्रखर निदर्शने केली. २३ ऑगस्ट १९८८ रोजी सोव्हिएत शासनाविरोधात सर्व संघटनांनी एकत्र येत विंजीस पार्क येथे अडीच लाख लोकांची सभा घेतली. या लोकांची ६०० कि.मी. लांबीची मानवी साखळी करून निदर्शने केली. स्वातंत्र्यवादी चळवळीला लिथुआनियन जनतेचे वाढते प्रोत्साहन मिळाल्यावर ११ मार्च १९९० रोजी नेत्यांनी सोव्हिएत युनियनचे वर्चस्व झुगारून लिथुआनिया हा स्वतंत्र सार्वभौम देश अस्तित्वात आल्याचे जाहीर केले. सप्टेंबर १९९१ मध्ये या नवदेशाला युनोचे सदस्यत्व मिळाले.