scorecardresearch

मूलद्रव्यांचे नामकरण- १

आज मूलद्रव्यांची संख्या शंभरावर आहे.

मूलद्रव्यांचे नामकरण- १

मानवी प्रगतीचा इतिहास म्हणजे मूलद्रव्यांच्या उपलब्धीचा इतिहास. आज मूलद्रव्यांची संख्या शंभरावर आहे. या सर्वाची नावे कशी निर्माण झाली, मान्य झाली हे पाहणं नुसतंच उद्बोधक नाही, तर मनोरंजक देखील आहे. आयुपॅक (IUPAC-International Union of Pure and Applied Chemistry) या संस्थेने या संबंधी अतिशय मोलाचे काम केले आहे. नामकरणाची सुरुवात अगदी प्राचीन काळापासूनची, मात्र रसायनशास्त्र हे शास्त्र आहे, हे प्रथम रॉबर्ट बॉइल (१६२७-१६९२) या शास्त्रज्ञाने दाखवून दिले, मूलद्रव्यांची यादी तयार केली, त्यामुळे तोपर्यंत प्रचलित असलेल्या अ‍ॅदरिस्टॉटलच्या ‘चार मूलद्रव्यांचा सिद्धांत’ बाद झाला. १७८७ साली लॅव्होझीएने मूलद्रव्यांची नावे सोपी करण्याची पद्धत सांगितली. मूलद्रव्यांचे शिस्तबद्ध, वर्गीकरण मेंडेलिव्हनेकरून आवर्त सारणी तयार केली. १८७१ साली या तालिकेत ६३ मूलद्रव्यांची मांडणी केली होती, आज ११८ मूलद्रव्ये सापडली आहेत; त्यातली विसाहून अधिक कृत्रिमरीत्या तयार केली आहेत.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला. संशोधकांचं कार्य एकमेकांना उपलब्ध होऊ लागले. आंतरराष्ट्रीय सहकार्य, आदानप्रदान करण्याची आवश्यकता जाणवू लागली. यामुळे निरनिराळ्या देशांतील संस्था एकत्र येऊन एक मोठी, सर्वव्यापी संस्था निर्माण करण्याचा विचार प्रगत झाला, आणि १९१९ ला आयुपॅक संस्था स्थापन झाली. याच काळात औद्योगिक प्रगती, तंत्रज्ञान वाढ यामुळे वजने, त्यांची मोजमापे, मुलद्रव्याची चिन्हे यांचं आंतरराष्ट्रीय एकत्रीकरण करावे, यामध्ये सुसूत्रीकरण व्हावे हे ठरविण्यासाठी १९१७च्या सुमारास शास्त्रज्ञांच्या बठका झाल्या. नवनिर्मित संस्थेचे कार्यक्षेत्र, त्यातील सूत्रबद्धता, विज्ञानाचा काटेकोरपणा व मुख्य म्हणजे सर्वच मोजमापात आवश्यक अशी एकवाक्यता, अचूकता याचा खोलात जाऊन विचार केला गेला. संशोधनाच्या उच्च फलितासाठी या बाबी आवश्यक होत्या, आहेत, म्हणून सर्वच चर्चा कठोर होत्या, थोडय़ाही चुकेला थारा नव्हता. आयुपॅकचा दबदबा सतत टिकून आहे. याचं हे एकमेव कारण आहे. मिळमिळीतपणा, तडजोड या गोष्टींना येथे वावच नाही, हे आहे निखळ चोवीस कॅरेटचं सोनं!

तंत्रज्ञानाच्या, मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात अचूकतेलाच प्राधान्य आहे. संगणक, अवकाश यात्रा, नॅनोकण, शरीरशास्त्र या सर्वच क्षेत्रात झालेली प्रगती या अचूकपणाची द्योतक आहे, फलित आहे. आयुपॅकचे म्हणूनच जितके गुण गावे तितके थोडे.

– डॉ. द. व्यं. जहागीरदार

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-04-2018 at 04:08 IST