सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

‘मॅन इटर्स ऑफ कुमाऊं’ या पुस्तकामुळे प्रसिद्ध झालेले त्याचे लेखक जिम कॉब्रेट हे भारतातील पहिले व्याघ्र अभयारण्य- हेली नॅशनल पार्कचे जनक आहेत. त्याचेच नाव पुढे जिम कॉब्रेट नॅशनल पार्क झाले. ननिताल येथे राहणारे आणि एक कुशल शिकारी तसंच कुमाऊंच्या जंगलांची खडान्खडा माहिती असणाऱ्या जिम कॉब्रेटना नरभक्षक वाघांचा नि:पात करण्यासाठी बोलावले जाई. त्यापूर्वीच्या दोन दशकांमध्ये कुमाऊं आणि गढवाल प्रदेशांतल्या साधारणत: १२०० माणसांचा बळी कुमाऊंच्या या नरभक्षक वाघ आणि बिबटय़ांनी घेतला होता.

जिम कॉब्रेटनी पहिली शिकार केली ती चंपावत या वाघाची. या वाघाने एकूण ४३६ माणसांचा बळी घेतला होता, जिम कॉब्रेटनी शिकार केलेला पनार या नरभक्षक बिबटय़ाने ४०० जणांचा बळी तर रुद्रप्रयागच्या नरभक्षक बिबटय़ाने १२६ यात्रेकरूंचा बळी घेतल्याची नोंद आहे. जिमनी एकूण १९ वाघ आणि १४ बिबटय़ांची शिकार केली. परंतु पुढे त्यांच्या मानसिकतेत बदल झाले. वाघ आणि बिबटय़ांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालल्याचे लक्षात आल्यावर कुमाऊं प्रदेशातल्या रामनगर जवळ त्यांनी वाघ आणि वन्यप्राण्यांसाठी हेली नॅशनल पार्क स्थापन केले. १९३६ साली स्थापन केलेल्या या अभयारण्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घालून त्यांच्या जोपासनेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. १९५७ मध्ये या अभयारण्याचं नाव बदलून जिम कॉब्रेट नॅशनल पार्क करण्यात आले. ५२० चौ.कि.मी. क्षेत्राच्या या अभयारण्यात ५० प्रजातींचे सस्तन प्राणी, ५८० प्रजातींचे पक्षी आणि ११० प्रजातींच्या वनस्पतींचा समावेश आहे. वन्यजीव संवर्धनतज्ज्ञ जिम कॉब्रेट एक कुशल छायाचित्रकारही होते आणि वन्यप्राणी जीवन तसेच शिकारीबद्दल त्यांची पुस्तके जगभरात विख्यात झाली. त्यांनी लिहिलेल्या नऊ पुस्तकांपैकी ‘मॅन इटर्स ऑफ कुमाऊं’, ‘माय इंडिया’, ‘जंगल लोर’, ‘जंगल स्टोरीज’ ही विशेष उल्लेखनीय आहेत. जन्मभर अविवाहित राहिलेले जिम कॉब्रेट त्यांच्या बहिणीबरोबर १९४७ मध्ये केनियातील न्येरी इथे जाऊन स्थायिक झाले. हृदयविकाराचा झटका येऊन १९५५ साली त्यांचे निधन झाले.