बुद्धिमत्ता ही काही केवळ मानवाची मक्तेदारी नाही. निसर्गात प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती इत्यादी अनेकदा कमी-अधिक प्रमाणात बुद्धिमान वर्तन करताना दिसतात. हीच बाब कृत्रिम बुद्धिमत्तेसही लागू करता येईल का, हा आता कळीचा प्रश्न आहे.  मधाच्या पोळय़ामध्ये वेगवेगळी कामे करणाऱ्या माश्या असतात. यातील कामकरी माश्या त्यांच्या पोळय़ापासून खूप दूर जाऊन मध शोधतात आणि पुन्हा पोळय़ाजवळ येऊन नृत्य करतात. या नृत्यातल्या त्यांच्या शरीराच्या हालचाली या इतर कामकरी मधमाश्यांना परागकण स्रोतापर्यंत पोचण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.  पक्ष्यांचे थवे एका ठरावीक त्रिकोणी रचनेत उडतात. त्यामुळे हवेचा अवरोध कमी करण्याबरोबरच भक्ष्य शोधणे आणि भक्षकापासून बचाव करणे असे दोन्ही उद्देश साध्य होतात. मासेसुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवू शकतात. ज्यातून अन्न देण्यात येते त्या नळीचा रंग गोल्डफिश एक वर्ष लक्षात ठेवतो. मासे आपला शेजारी ओळखू शकतात आणि इतर माशांच्या तुलनेत ते शेजाऱ्यांशी कमी आक्रमकपणे वागतात.

बुद्धिमान म्हणता येईल, असे वर्तन वनस्पती जगातही आढळते. निसर्गात कीटक खाणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, त्या आधी कीटकांना रंग किंवा वास किंवा चवीची लालूच दाखवून त्यांच्याकडे आकर्षित करतात आणि मग त्यांना खातात. वनस्पती पुनरुत्पादन करण्यासाठी जे प्राणी परागसिंचन करतात, त्यांना आकृष्ट करतात. त्यासाठी रंगांनी त्यांना आकर्षित करतात किंवा त्यांना आवडेल असे खाद्य पुरवतात.

चिंपान्झी, डॉल्फिन आणि हत्ती यांचा मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विकसित झाला असल्याने, यांच्याकडे विचार करण्याची क्षमता असते. ते त्यांच्या भावना प्रकट करू शकतात आणि त्यातल्या प्रत्येकाचे वेगळे व्यक्तिमत्त्वही असते.  सर्वसाधारणपणे निसर्गदत्त बुद्धिमत्तेचा संबंध हा प्राण्याच्या मेंदूशी जोडला जातो, परंतु वर दिलेल्या उदाहरणांवरून असे लक्षात येते की निसर्गात मेंदू नसलेल्या प्रजाती आणि वनस्पती यांच्यामध्येदेखील बुद्धीसदृश वर्तन आढळते. या निसर्गदत्त बुद्धिमत्तेचा अभ्यास करून संशोधकांनी त्याचे गणिती प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला. चार्ल्स डार्विन यांच्या प्राण्यांच्या उत्क्रांतीसंबंधित तत्त्वाचे तसेच पुनरुत्पादन पद्धतीच्या जीवशास्त्रीय संरचनेचे डॉ. जॉन हॉलंड यांनी सर्वप्रथम गणिती रूपांतर केले. त्याआधारे ‘जेनेटिक अल्गोरिदम’ बनवले. योग्य जोडीदार मिळवण्यासाठीची प्राण्यांमधील स्पर्धा, मीलनानंतर शुक्राणूंमधील स्पर्धा इत्यादी प्रक्रियांचे गणिती रूपांतर झाले आहे. याचा वापरही कृत्रिम बुद्धिमत्तेत केला जातो. निसर्गात सर्वात विकसित असलेल्या मानवी बुद्धिमत्तेबाबत आपण पुढच्या भागात जाणून घेऊ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकरंद भोसले,मराठी विज्ञान परिषद