द्विमित चित्रांप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्जकतेतून त्रिमित, चतुर्मित आणि पंचमित आकृत्यासुद्धा तयार करणे आता शक्य आहे. समजा एक कुत्रा असलेले चित्र आहे. विभाजनाचे प्रारूप वापरून चित्रातील कुत्रा चित्रातल्या इतर गोष्टींपासून वेगळा करता येतो. त्याचप्रमाणे चित्रातून तो तिसऱ्या मितीत बाहेर काढून त्याचे त्रिमित स्वरूप बनवता येते. याही पुढे जाऊन ही त्रिमित आकृती आपोआप गोल फिरवता येते. यामुळे आता या कुत्र्याचे निरीक्षण सर्व बाजूंनी शक्य होते. एवढेच नव्हे तर त्या कुत्र्याची शेपटी हलताना दाखविणेसुद्धा शक्य आहे. हे अर्थात फक्त चित्रांपुरते मर्यादित नाही. एक साधी पटकथा देऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपण संपूर्ण चित्रपट तयार करू शकतो. असे प्रयोग होत आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञान आणि कला

एक साधे उदाहरण घ्यायचे झाले तर भाषेच्या प्रारूपाला भेंडीची भाजी किंवा उकडीचे मोदक कसे करतात याची कृती (रेसिपी) विचारता येऊ शकते. आणि ती कृती मिळाल्यावर ती या चित्रपट बनवणाऱ्या प्रारूपाला दिल्यास तो आधी त्या कृतीमधील विविध भागांची चित्रे तयार करेल आणि त्यांना जोडून एक संपूर्ण चित्रफीत. हे आजही सर्जनशील आणि निर्माणशील प्रारूपांमुळे शक्य आहे. यात हवा तेवढा तपशील जोडणे शक्य आहे. प्रत्येक घटक कसा दिसतो हे त्रिमितीत दाखवणे शक्य आहे. भाषा प्रारूपांच्या मदतीने कोणता घटक कुठे आणि किती किमतीत मिळतो हेही दाखवणे शक्य आहे.

काळानुरूप बदलणाऱ्या घटकांच्या मालिकांसाठीदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रारूपे असतात. उदाहरणार्थ, एखाद्या ताऱ्याची तेजस्विता कशी बदलते किंवा हवामानात कसे बदल होतात. ही प्रारूपे वापरून अधिकाधिक अचूक अंदाज वर्तवता येऊ शकतात. अर्थात स्टॉक मार्केटप्रमाणे खूप जास्त घटक असल्यास ते तितकेसे विश्वासार्ह ठरत नाहीत.

भाषेच्या मॉडेल्सप्रमाणेच या पायाभूत (फाऊंडेशन) प्रारूपांमध्येही पूर्वग्रह असू शकतो.  उदाहरणार्थ, नेहमी एखाद्याच विशिष्ट जातीचा कुत्रा चित्रित करणे, असे होऊ नये म्हणून इतर सर्जनशील प्रारूपे वापरून नवी विदा निर्मिली जाते. अशा प्रकारे अनेक पायाभूत प्रारूपे तयार होत आहेत. पायाभूत प्रारूपे विविध प्रकारची कामे करू शकणारी, बहुउपयोगी आणि शक्यतो वास्तविक जगातील पूर्वग्रहांशिवाय असली तरी ती परिपूर्ण खचितच नाहीत. त्यांची स्वत:ची वेगळीच आव्हाने आहेत. मानवांप्रमाणे विचार करू शकणाऱ्या आणि शिकू शकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने जाणारा हा रोमांचक प्रवास आहे.

– आशिष महाबळ

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org