जे आले ते रमले.. : थॉमस आणि जॉर्ज कँडी (१)

थॉमस आणि जॉर्ज कँडी या दोघा जुळ्या भावांचा जन्म १८०४ मध्ये इंग्लंडमध्ये झाला

थॉमस कँडी

गेल्या सहस्रकात सुपीक, संपन्न भारतीय प्रदेश आणि सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीने जगातल्या विविध प्रदेशांतल्या लोकांना भुरळ घातली. विविध प्रदेशांमधून आलेले आक्रमक, व्यापारी, धर्मोपदेशक, धर्मप्रचारक, कलाकार, संत, साहित्यिक आणि नोकरदार या सर्वाना येथील संस्कृतीने जसे पूर्णपणे सामावून घेतले, तसेच त्यातील अनेकांनी या संस्कृतीचा, येथील जीवनशैलीचा उत्कर्ष साधण्यात मोठे योगदान दिले. असे योगदान देणाऱ्यांत ख्रिस्ती मिशनरी आणि ईस्ट इंडिया कंपनीचा नोकरवर्गही आहे.

मेजर थॉमस कँडी हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे लष्करी अधिकारी भारतीय भाषा पंडित होते. त्यांनी मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणासाठी मोठे योगदान दिले. ते मराठीचे लेक्झीकोग्राफर म्हणजे शब्दकोशकार आणि आर्थोग्राफर म्हणजे शुद्धलेखनशास्त्र तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. थॉमस कँडी आयुष्याची शेवटची ५५ वर्षे भारतात राहिले. या काळात त्यांनी भारतात शैक्षणिक कार्य आणि भारतीय भाषांमध्ये साहित्य निर्मिती केली.

थॉमस आणि जॉर्ज कँडी या दोघा जुळ्या भावांचा जन्म १८०४ मध्ये इंग्लंडमध्ये झाला. थॉमसने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मॅकडेलीन कॉलेजमध्ये भारतीय भाषांचे शिक्षण घेतल्यावर दोघे बंधू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात क्वार्टरमास्टरच्या पदांवर रुजू झाले. १८२२ साली कँडी बंधू भारतात आले. थॉमसचे लष्करातले काम प्रामुख्याने दुभाषा आणि भाषांतरकाराचे होते.

१८३० साली कंपनीच्या लष्करातले कॅप्टन जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांनी इंग्लिश-मराठी डिक्शनरी तयार करण्याचे काम हातात घेतले. मोल्सवर्थनी थॉमस आणि जार्ज या कँडी बंधूंना त्यासाठी मदतनीस म्हणून घेतले. या बंधूंपैकी थॉमस हा मराठी भाषेचा विशेष अभ्यासक आणि जाणकार होता. पुढे कॅप्टन मोल्सवर्थ आजारी पडले आणि डिक्शनरीचे उर्वरित काम कँडी बंधूंकडे सुपूर्द करून १८४० मध्ये कायमसाठी इंग्लंडला परतले. १८४० ते १८४७ या काळात कँडी बंधूंनी डिक्शनरीचे काम पूर्ण केल्यावर जॉर्ज कँडीने लष्कराचा राजीनामा देऊन तो पूर्णवेळ मिशनरी बनला. मिशनचे काम म्हणून जॉर्जने ‘ख्रिस्ती धर्म कसा उत्पन्न झाला आणि कसा पृथ्वीवर वाढला’ ही पुस्तिका लिहून प्रसिद्ध केली. १८५४ साली जॉर्ज इंग्लंडला परत गेला.

sunitpotnis@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Major thomas kennedy and george kennedy

ताज्या बातम्या