मध्ययुगीन काळात भारतात येऊन स्थायिक झालेल्या, दूरवरच्या प्रदेशांमधील लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने आपापली वेगळी ओळख करून ठेवली आहे. परंतु एक सामान्य गुलाम म्हणून विकला गेलेला, आफ्रिकेतल्या हबशी ऊर्फ सिद्दी समाजातला तरुण मलिक अंबर याचा जीवनप्रवास या सर्वापेक्षा अद्भुत आहे!

दक्षिण इथिओपियाच्या कंबाता या प्रदेशात १५४८ साली अत्यंत गरीब, मूर्तिपूजक कुटुंबात मलिक अंबरचा जन्म झाला. त्याचे मूळचे नाव ‘छापू’. या प्रदेशाला पूर्वी अ‍ॅबीसीबिया असेही नाव होते. या नावावरून या प्रदेशातल्या लोकांना ‘हबशी’ हे नाव रूढ झाले. गरीब दरिद्री हबशी कुटुंबात जन्मलेल्या छापूला त्याच्या आईवडिलांनी प्रथम दक्षिण येमेनमध्ये एका गुलामांच्या दलालाला वीस टुकात घेऊन विकले. येमेनच्या दलालाने छापूला बगदाद येथल्या गुलामांच्या मोठय़ा बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवले. या बाजारपेठेतून छापूला मक्का येथील गुलामांचा दलाल मीर कासम अल् बगदादी याने विकत घेऊन त्याला इस्लाम धर्माची दीक्षा देऊन मुस्लीम रीतिरिवाज आणि जुजबी शिक्षण दिले.

त्या काळात बगदाद आणि येमेन येथून आफ्रिकेतल्या गरीब मुलांना, तरुणांना गुलाम बनवून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये योद्धे म्हणून पुरवण्याचा व्यवसाय तेजीत होता.

मीर कासम अली बगदादीने भरभक्कम शरीराच्या छापूला मलिक अंबर या नावाने अहमदनगरच्या निजामशहाचा प्रधान चंगेजखान यास विकले. चंगेजखान हा स्वत:सुद्धा हबशी जमातीचाच होता. त्याच्याकडे अनेक हबशी लोक नोकरीला होते. मलिक अंबर हा चंगेजखानाकडे वीस वर्षे नोकरीस होता. जात्याच प्रतिभावंत असलेला मलिक या काळात युद्धशास्त्र, लष्करी प्रशासन आणि राजकीय मुत्सद्देगिरीतही तरबेज झाला. त्या काळात आफ्रिकेतून हबशी लोकांना, भारतीय सरदार गुलाम म्हणून विकत घेत. या सरदार मालकांचा मृत्यू झाल्यावर हे हबशी, गुलामगिरीतून मुक्त होत आणि स्वेच्छेने काही व्यवसाय किंवा सन्यामध्ये नोकरी करीत असत.

मलिक अंबरही चंगेजखानाच्या मृत्यूनंतर मुक्त होऊन त्याने स्वत:चे हबशी लोकांचे छोटेखानी सन्य उभे केले आणि तो भाडोत्री सैनिक पुरवू लागला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com