25 October 2020

News Flash

निशब्द व्हा!

रात्री, तोंड बंद ठेवणं खूपच उपयुक्त ठरतं. मी अनेक लोकांचं निरीक्षण करत आलो आहे

तुम्ही नदीकिनारी बसलेले आहात आणि नदी शेजारून वाहतेय आणि तुम्ही फक्त बघताय. त्यात कोणतीच उत्सुकता नाही, घाई नाही. कोणीच तुमच्यावर काही लादत नाहीये. जरी तुमचं काही हुकल्यासारखं वाटत असेल, तरी प्रत्यक्षात काहीच हुकत नाहीये. तुम्ही केवळ बघताय, खरं तर बघणे हा शब्दही योग्य नाही, कारण त्यात क्रियाशील असल्याची भावना आहे. तुम्हाला केवळ दिसतंय, दुसरं  काहीच नाही.

मुख हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथूनच तर पहिली क्रिया सुरू होते; पहिली क्रिया तुमच्या ओठांनी सुरू केली. सगळ्या क्रियांची सुरुवात मुखाभोवतीच्या भागातूनच होते : तुम्ही श्वास घेतला, तुम्ही रडलात, तुम्ही आईच्या स्तनांसाठी लुचू लागलात आणि मग तुमचं तोंड कायमच प्रचंड क्रियाशील राहिलं.

‘‘तुम्ही जेव्हा ध्यानासाठी बसता तेव्हा तुम्हाला शांत राहावंसं वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे तोंड पूर्णपणे बंद ठेवणं. तुम्ही तोंड पूर्ण बंद ठेवलंत तरच तुमची जीभ टाळूला स्पर्श करेल; तुमचे दोन्ही ओठ पूर्णपणे मिटलेले असतील. पूर्ण बंद करा तोंड- पण मी तुम्हाला सांगतोय त्याचं पालन केलंत तरच ते शक्य होईल, त्यापूर्वी नाही.

तुम्ही हे करू शकता- तोंड बंद ठेवण्यासाठी फार मोठे प्रयत्न करण्याची गरज नाही. तुम्ही पुतळ्यासारखे बसून राहू शकता, तोंड पूर्णपणे बंद करून, पण त्यामुळे क्रिया थांबणार नाही. आतमध्ये खोलवर विचार सुरूच राहतील आणि विचार सुरू असतील तर तुम्हाला ओठांमध्ये सूक्ष्म कंपनं जाणवत राहतील. बाकीच्यांच्या नजरेत ती येणार नाहीत, कारण, ती खूपच सूक्ष्म असतील, पण तुम्ही विचार करत असाल, तर ओठ थरथरतील- अगदी सूक्ष्म अशी थरथर असेल ती.

तुम्ही जेव्हा खरोखर शिथिल होता, तेव्हा ही थरथर थांबते. तुम्ही बोलत नाही आहात आणि तुमच्या आतही कोणतीच क्रिया सुरू नाही. आणि मग तुम्ही विचारही करत नसाल. तुम्ही काय करत असाल? – विचार येतील आणि जातील. त्यांना येऊ-जाऊ द्या; त्यातच काही अडचण नाही. तुम्ही त्यात गुंतू नका; तुम्ही तटस्थ राहा, अलिप्त राहा. विचार येत-जात असताना तुम्ही केवळ बघत राहा. त्याची काळजी तुम्ही करू नका. तोंड बंद केलंत की तुम्ही शांत राहाल. त्याच वेळी विचारही आपोआप नाहीसे होतील. त्यांना टिकून राहण्यासाठी तुमचं सहकार्य लागतं; तुम्ही त्यांच्याशी झगडलात तरी ते तिथेच राहतील. कारण तेही एक प्रकारचं सहकार्यच आहे. एक सहकार्य बाजूने असतं तर एक विरोधात. दोन्ही क्रियेचेच प्रकार आहेत. त्यामुळे फक्त बघत राहा.

रात्री, तोंड बंद ठेवणं खूपच उपयुक्त ठरतं. मी अनेक लोकांचं निरीक्षण करत आलो आहे, त्यामुळे प्रथम मी असा सल्ला देईन की मोठी जांभई द्या. तुम्हाला जेवढं रुंद तोंड उघडता येईल, तेवढं उघडा, जबडय़ाला जेवढा ताण देणं शक्य आहे तेवढा द्या आणि मोठी जांभई द्या; तुम्हाला दुखेलही त्यामुळे. हे दोन-तीन वेळा करा. यामुळे तोंड अधिक काळ बंद ठेवण्यात मदत होईल. आणि मग दोन-तीन मिनिटं काहीही गोंधळ घालणारं, निर्थक, मोठय़ाने बोला. जे काही मनात येईल ते मोठय़ाने बोला. त्याचा आनंद लुटा. मग तोंड बंद करा.

विरुद्ध टोकावरून हलणं तुलनेने सोपं असतं. तुम्हाला हात शिथिल सोडायचा असेल, तर प्रथम त्याला शक्य तितका ताण देणं कधीही चांगलं. मूठ घट्ट वळा, शक्य तेवढा ताण द्या. एकदम विरुद्ध टोकाला जा आणि मग शिथिल व्हा- मग तुमची चेतासंस्था आणखी सखोल शिथिल होईल. हावभाव करा, चेहरा वेडावाकडा करा. जांभई द्या, मग दोन-तीन मिनिटं निर्थक बोला आणि तोंड बंद करा. या तणावामुळे तुमचे ओठ आणि मुख शिथिल होण्याची शक्यता वाढेल. तोंड बंद ठेवा आणि नुसते बघत राहा. लवकरच शांतता तुमच्यात उतरत जाईल.

काहीच करू नका.. जसे तुम्ही नदीकिनारी बसलेले आहात आणि नदी शेजारून वाहतेय आणि तुम्ही फक्त बघताय. त्यात कोणतीच उत्सुकता नाही, घाई नाही. कोणीच तुमच्यावर काही लादत नाहीये. जरी तुमचं काही हुकल्यासारखं वाटत असेल, तरी प्रत्यक्षात काहीच हुकत नाहीये. तुम्ही केवळ बघताय, खरं तर बघणे हा शब्दही योग्य नाही, कारण त्यात क्रियाशील असल्याची भावना आहे. तुम्हाला केवळ दिसतंय, दुसरं काहीच नाही. तुम्ही केवळ नदीकिनारी बसलेले आहात, नदी वाहतेय आणि तुम्हाला ते दिसतंय किंवा तुम्ही काहीच न करता आकाशाकडे पाहताय आणि ढग चालले आहेत.

ही निष्क्रियता अत्यावश्यक आहे; हे समजून घेतले पाहिजे, कारण तुम्हाला क्रियाशीलतेने पछाडले की त्याची उत्सुकता होते, त्यातून सक्रिय प्रतीक्षा सुरू होते. मग तुम्ही सगळा मुद्दाच हरवून बसता; आता क्रियेने पुन्हा मागच्या दाराने प्रवेश मिळवलेला असतो. तेव्हा केवळ निष्क्रिय प्रेक्षक व्हा.

ही निष्क्रियता आपोआप तुमचं मन रिकामं करेल. क्रियाशीलतेचे बुडबुडे, मनाच्या ऊर्जेचे बुडबुडे सारे शांत होतील आणि तुमच्या जाणिवेच्या पृष्ठभागावर कोणत्याच लाटा, कोणतेच बुडबुडे राहणार नाहीत. तो एखाद्या शांत आरशासारखा होऊन जाईल.’’

ओशो, तंत्रा: द सुप्रीम अंडरस्टॅण्डिंग, टॉक #४

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल www.osho.com

 भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:01 am

Web Title: article from osho tantra the supreme understanding book
Next Stories
1 आयुष्य म्हणजे तत्त्वज्ञानाचा वर्ग नाही!
2 जाणीव नावाची मासोळी
3 अस्तित्व: स्वत:च्या आतलं
Just Now!
X