22 January 2019

News Flash

दयामरण हा हक्कच

दयामरण किंवा इच्छामरण हे वैद्यकीय मंडळाच्या परवानगीने असावं.

दयामरण किंवा इच्छामरण अर्थात मृत्यूचा पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य स्वीकारलं गेलं पाहिजे. प्रत्येक रुग्णालयात मरू इच्छिणाऱ्या रुग्णांसाठी एक जागा हवी आणि ज्यांनी मृत्यूचा पर्याय निवडला आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवलं जावं, त्यांना मदत केली जावी. त्यांचा मृत्यू सुंदर झाला पाहिजे.

आता यापुढे जगण्याची इच्छा नाही, असं म्हणणाऱ्यांना एक महिन्याची मुदत दिली पाहिजे. त्यासाठी वयोमर्यादा निश्चित करावी, ७५ किंवा ८० वर्ष अशी काही तरी. हा काळ या व्यक्तींनी रुग्णालयात घालवावा. त्यांना सर्व सुविधा दिल्या जाव्यात आणि आनंदी मृत्यूसाठी त्यांना सज्ज करण्याचा भाग म्हणून ध्यानधारणेचं प्रशिक्षणही दिलं जावं. या काळात त्या व्यक्तीचा विचार बदलला, तर तिला घरी कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडे परत जाण्याचं स्वातंत्र्य असावं. भावनाप्रधान लोक संपूर्ण महिनाभर भावनाप्रधान राहू शकत नाहीत. आत्महत्या केलेल्या बहुतेक लोकांनी एक क्षण आणखी वाट बघितली असती, तर आत्महत्येचा विचार नक्कीच बदलला असता असं म्हटलं जातं. राग, मत्सर, द्वेष किंवा आणखी कशाच्या तरी भरात ते आयुष्याचं मोल विसरतात आणि आत्महत्या करतात.

दयामरण किंवा इच्छामरण हे वैद्यकीय मंडळाच्या परवानगीने असावं. रुग्णालयात एक महिनाभर विश्रांती, त्या व्यक्तीला शांत करण्यासाठी लागेल ती सगळी मदत आणि सगळे कुटुंबीय, मित्रमंडळी तिला भेटायला येत आहेत, कारण ती व्यक्ती एका दीर्घ प्रवासाला निघाली आहे. तिला थांबवण्याचा प्रश्नच येत नाही; ती व्यक्ती दीर्घकाळ जगली आहे आणि तिला आता जगत राहायचं नाही, तिचं काम संपलंय. तिला या महिनाभरात ध्यान करायला शिकवलं पाहिजे.

हेतू हा की जेव्हा मृत्यू येईल तेव्हाही ती व्यक्ती ध्यान करू शकेल आणि मृत्यूसाठी वैद्यकीय मदतही दिली पाहिजे, मग मृत्यूही झोपेसारखा येईल- हळूहळू, संथपणे, एकीकडे ध्यान सुरू आहे, निद्राच पण अधिक खोल. या पद्धतीने आपण हजारो लोकांच्या मृत्यूचं रूपांतर आत्मज्ञानात करू शकतो.

दयामरण किंवा इच्छामरण ही काळाची गरज होत चाललीये, कारण वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे लोक प्रदीर्घ काळ जगत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आयुष्य वाचवण्यासाठी मदत करत राहू, अशी शपथ हिपोक्रेटसने वैद्यकीय व्यावसायिकांना दिली होती खरी, मात्र दहा मुलांपैकी सगळीच्या सगळी जगतील असाही दिवस येईल हे त्याला तरी कुठे माहीत होतं. आता ते प्रत्यक्ष घडतंय. अमेरिकेत हजारो लोक रुग्णालयातल्या बिछान्यांवर दीर्घकाळ पडलेले आहेत, त्यांना सगळ्या प्रकारची यंत्रं जोडलेली आहेत. त्यातले अनेक जण तर कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत. याला काय अर्थ आहे? रस्त्यावर किती तरी लोक मरत आहेत, उपाशी आहेत- त्यांना मदत का करू नये?

जबरदस्ती मग ती कोणत्याही स्वरूपात असो लोकशाहीबाच आहे. त्यामुळे हे सगळं बुद्धिनिष्ठ असावं असं मला वाटतं. ही मर्यादा ८० वर्ष ठरवू. आयुष्य पुरेसं जगून झालेलं आहे. मुलं मोठी झाली आहेत. ती व्यक्तीही सेवानिवृत्त झाली आहे; काय करावं हे तिला कळत नाही. म्हणूनच वृद्ध लोक इतके चिडखोर असतात, त्यांना करण्यासारखं काहीच काम नसतं, म्हणून आदर किंवा प्रतिष्ठा नसते.

ते सतत वैतागलेले असतात आणि थोडीशी चिथावणीही त्यांना आरडाओरडा सुरू करण्यासाठी पुरेशी असते. हे केवळ त्यांचे वैफल्य आहे. ते सारखं दिसून येत आहे. खरं तर त्यांना मृत्यू हवा आहे. पण ते तसं म्हणू शकत नाहीत. कारण मृत्यूची कल्पनाही निषिद्ध मानली गेली आहे.

त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, पण केवळ मरणाचं नव्हे; तर त्यांना एक महिना मृत्यूचं प्रशिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. ध्यानधारणा आणि शरीराची काळजी घेणं हा या प्रशिक्षणाचा पायाभूत भाग असला पाहिजे. त्यांनी आरोग्यपूर्ण पद्धतीने, संपूर्णत्वात, शांतपणे मृत्यूला कवटाळावं- हळूहळू गाढ निद्रेच्या अधीन व्हावं.

आणि या निद्रेला ध्यानाची जोड मिळाली, तर कदाचित मृत्यूसमयी त्यांना आत्मज्ञानाची प्राप्तीही होईल. कदाचित त्यांना कळेल की, केवळ शरीर मागे टाकलं जातंय आणि ते तर अनंतचा भाग होत आहेत. त्यांचा मृत्यू सामान्यपणे येणाऱ्या मृत्यूहून अधिक चांगला होईल. कारण सामान्यपणे येणाऱ्या मृत्यूत त्या व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळत नाही. मृत्यूसाठी विशेष व्यवस्था असेल, तिथे सर्व प्रकारची योजना केली जात असेल, तर मरणारी व्यक्ती अत्यंत आनंदी, उत्साही मार्गाने व कृतज्ञतापूर्वक हे जग सोडून जाईल.

अशा परिस्थितीत खरं तर अधिकाधिक लोक अशा पद्धतीने रुग्णालयात मरणाला सामोरं जाण्याचा पर्याय स्वीकारतील. मृत्यूच्या एका विशेष सदनात, जिथे सर्व प्रकारची तयारी केलेली आहे अशा ठिकाणी. आनंदाने, उत्साहाने, अतीव कृतज्ञतेने ते जगाचा निरोप घेतील.

मी दयामरणाच्या किंवा इच्छामरणाच्या बाजूने आहे. ‘सॉक्रेटिस पॉयझन्ड अगेन आफ्टर २५ सेंच्युरीज’ या लेखातील संक्षिप्त भाग/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/ सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन/ www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

First Published on March 31, 2018 1:38 am

Web Title: osho philosophy part 11